Ticker

6/recent/ticker-posts

: बंद रेल्वे फाटक उघडण्याचा प्रयत्न केल्याने वाद; काठी व दगडाने मारहाण, कर्मचाऱ्याच्या डोक्याला दुखापत

      


  सोनपेठ  (प्रतिनिधी): शिवशंकर तुपकर 

लेव्हल क्रॉसिंग फाटक क्रमांक ५३ येथे कर्तव्य बजावत असलेल्या रेल्वे फाटक कर्मचाऱ्यावर ६ ते ७ अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची गंभीर घटना मध्यरात्री घडली. बंद असलेले रेल्वे फाटक उघडण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना कर्मचाऱ्याने विरोध केल्यानंतर हा हल्ला करण्यात आला. या घटनेत कर्मचाऱ्याच्या डोक्याला रक्तस्रावाची दुखापत झाली आहे.

       दिनांक ९ व १० सप्टेंबरच्या मध्यरात्री सुमारे २.३५ वाजता रेल्वे गाडी क्रमांक १७६११ राज्यराणी एक्स्प्रेस जात असताना काही अज्ञात व्यक्तींनी बंद असलेल्या फाटकाच्या बूमशी छेडछाड करून ते उघडण्याचा प्रयत्न केला. यावेळी कर्तव्यावर असलेले ट्रॅक मेंटेनर ओमप्रकाश गिरी यांनी त्यांना विरोध केला. त्यानंतर संबंधितांनी काठी आणि रेल्वे रुळावरील दगडाने गिरी यांच्यावर हल्ला केला.

       घटनेची माहिती मिळताच आरपीएफ निरीक्षक, छत्रपती संभाजीनगर व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. जखमी गिरी यांना वैद्यकीय तपासणी व उपचारासाठी नेण्यात आले. या प्रकरणी एफआयआर नोंदणीची प्रक्रिया सुरू असून, आरपीएफ स्थानिक पोलिसांच्या मदतीने हल्लेखोरांची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

      रेल्वे प्रशासनाचा कठोर कारवाईचा इशारा

      रेल्वे प्रशासनाने रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यात अडथळा आणणे तसेच रेल्वे फाटक अनधिकृतपणे उघडणे किंवा तोडणे हे गंभीर गुन्हे असल्याचे स्पष्ट केले आहे. रेल्वे अधिनियम, १९८९ मधील कलम १४६ नुसार रेल्वे कर्मचाऱ्याच्या कर्तव्यात जाणीवपूर्वक अडथळा आणल्यास कारावास किंवा दंडाची तरतूद आहे. तसेच कलम १६०(१) नुसार रेल्वे फाटक अनधिकृतपणे उघडल्यास आणि कलम १६०(२) नुसार फाटक तोडल्यास कठोर शिक्षेची तरतूद आहे.

      रेल्वे प्रशासनाने नागरिकांना बंद फाटक ओलांडण्याचा किंवा ते स्वतः उघडण्याचा प्रयत्न करू नये, रेल्वे कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करू नये तसेच रुळांवर अनधिकृत प्रवेश, रील्स तयार करणे, स्टंट किंवा छायाचित्रणासारख्या धोकादायक कृती टाळण्याचे आवाहन केले आहे. संशयास्पद किंवा असुरक्षित प्रकार आढळल्यास नागरिकांनी रेल्वे हेल्पलाइन १३९ वर माहिती द्यावी, असेही प्रशासनाने कळविले आहे. “रेल्वे कर्मचाऱ्यांचा सन्मान करा, नियमांचे पालन करा आणि सुरक्षित राहा,” असे आवाहन नांदेड विभागीय रेल्वे प्रशासनाने केले आहे.