पळवून नेल्याचा वडिलांचा संशय; पोलिसांत तक्रार दाखल.
प्रतिनिधी :- रामेश्वर तोंडे लोणी गवळी.
अमडापूर येथील शाळेत इयत्ता नववीत शिकणारा मंगरूळ नवघरे येथील एक विद्यार्थी बेपत्ता झाल्याची घटना मंगळवार, दि. ८ सप्टेंबर रोजी समोर आली आहे. या प्रकरणी त्याच्या वडिलांनी अमडापूर पोलिस ठाण्यात पळवून नेल्याची तक्रार नोंदवली आहे.
कुंदन अमोल अंभोरे असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याचे वडील अमोल शिवाजी अंभोरे मंगरूळ नवघरे येथील रहिवासी असून, खामगाव येथे जलसंपदा विभागात कनिष्ठ लिपिकपदी कार्यरत आहेत. त्यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, कुंदन याचे वय १४ वर्षे ९ महिने आहे. कुंदन या वर्षीपासून अमडापूर येथील अमर विद्यालयात इयत्ता नववीत शिक्षण घेत आहे. तो दररोज सकाळी ९ वाजता एसटी बसने अमडापूर येथे येत होता. आणि सायंकाळी ६ वाजता घरी जात होता.
मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास कुंदन घरून शाळेसाठी अमडापूर येथे एसटी बसने गेला होता. सायंकाळी उशिरा पर्यंतही तो परत आला नाही. त्यामुळे अमोल अंभोरे यांनी नातेवाईक तसेच गावांतील लोकांनी कुंदनचा शोध घेतला. या दरम्यान अमडापूर येथील शाळेतील मित्रांनी कुंदन याला सायंकाळी अंदाजे ४.३० वाजताच्या सुमारास बस स्थानकाजवळ पाहिल्याचे सांगितले. तो अल्पवयीन असल्याचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तीने त्याला पळवून नेल्याचा संशय आहे, असे अमोल अंभोरे यांनी तक्रारीत नमूद केले आहे. कुंदनचे वय १४ वर्षे ९ महिने, रंग सावळा, उंची पाच फूट, केस काळे, अंगात पांढरे फुल बाह्यांचा शर्ट, खाकी पॅन्ट, पायात काळ्या रंगाचा बुट, तसेच सोबत निळ्या रंगाचे दप्तर आहे. तो कोणाला आढळल्यास अमडापूर पोलिस ठाण्याशी संपर्क करावा, असे आवाहन ठाणेदार जयसिंग राजपूत यांनी केले आहे.





Social Plugin