Ticker

6/recent/ticker-posts

*मृत्यूचा सापळा ठरतोय वर्धनगड घाट! संरक्षक कठड्यांविना आणि वाढलेल्या झाडे-झुडपांमुळे जीव मुठीत धरून प्रवास; प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष*

 


बुध  दि [प्रकाश राजेघाटगे ] 

वर्षाविहार आणि निसर्गरम्य परिसरासाठी प्रसिद्ध असलेला वर्धनगड घाट सध्या वाहनचालकांसाठी 'मृत्यूचा सापळा' बनला आहे. या घाटातील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, रस्त्याला जागोजागी तुटलेले संरक्षक लोखंडी बॅरिकेट्स, जाळी किंवा सिमेंट कठडे (Crash Barriers) व वाढलेल्या झाडाझुडपामुळे मोठा अनर्थ ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महसूल प्रशासन आणि रस्ते विकास महामंडळाच्या (पुणे) या गंभीर दुर्लक्षित कारभारामुळे प्रवाशांच्या जीवाला सतत धोका निर्माण झाला आहे.

   वर्धनगड घाटात अनेक वळणांवर रस्त्यालगत सुरक्षेसाठी सिमेंटचे कठडे किंवा लोखंडी पट्टे बसवण्यात आलेले नाहीत. वाहन चालवताना वाहन थोडे जरी रस्त्यावरून बाजूला गेले (साइडपट्टी सोडली), तर ते थेट खोल दरीत कोसळू शकते. एरवी पर्यटकांनी गजबजलेला हा घाट प्रवाशांसाठी आता जीवघेणा ठरत आहे.

      घाटातील प्रत्येक कॉर्नरवर रस्त्याच्या कडेला लावलेली झाडे आणि झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. या घनदाट झाडीमुळे समोरून येणारे वाहन अजिबात दिसत नाही, ज्यामुळे चालकांचा अंदाज चुकून ऐन वळणावर मोठे अपघात होत आहेत. कॉर्नर किनाऱ्यावर व रस्त्यावर येणारी ही धोकादायक झाडे-झुडपे त्वरित तोडण्यात यावीत, अशी आक्रमक मागणी वाहनधारकांनी केली आहे

रस्त्याच्या रुंदीकरणासाठी वनीकरण विभागाने हद्दीतील जागा देण्यास नकार दिल्याने अनेक महत्त्वाच्या कॉर्नर्सवर रस्ता अतिशय अरुंद राहिला आहे. यामुळे समोरासमोर वाहने आल्यास मोठी कसरत करावी लागते आणि वारंवार अपघात घडत आहेत.

      पावसाळ्यात रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी बाजूला नाले नसल्यामुळे पावसाचे पाणी थेट रस्त्यावरून वाहते. यामुळे रस्त्याच्या कडेला मोठे मोठे खड्डे व कट्स (Cuts) तयार झाले आहेत. परिणामी, दुचाकी वाहनांचे नियंत्रण सुटून मोठ्या प्रमाणावर अपघात होत आहेत आणि या ठिकाणी नाहक जीवित व वित्तहानी होत आहे. एकीकडे जीवघेणे अपघात घडत असतानाही महसूल प्रशासन आणि रस्ते विकास महामंडळ मात्र गांभीर्याने पावले उचलत नसल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने या गंभीर बाबीची तातडीने दखल घेऊन वर्धनगड घाटातील कॉर्नर्सवरील वाढलेली झाडे-झुडपे छाटावीत, रस्त्याचे त्वरित रुंदीकरण करावे, योग्य पाण्याचा निचरा करण्यासाठी नाले उभारावेत आणि तातडीने **संरक्षक लोखंडी बॅरिकेट्स व सिमेंट कठडे बसवावेत**, अशी मागणी संतप्त वाहनचालक व ग्रामस्थांमधून होत आहे. एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी शासन आणि प्रशासन याला गांभीर्याने घेणार का, हाच आता मोठा प्रश्न आहे!