Ticker

6/recent/ticker-posts

मनरेगा विभागातील तांत्रिक अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीचा आरोप

 :‌ 15 दिवसाची मुदत संपून महिना उलटला म्हणून 2ऑक्टोबर पासून 


पंचायत समितीचे आवारात बेमुदत उपोषण

अंकुश भोसले:- इंदापूर प्रतिनिधी 

इंदापूर, दि. २५ सप्टेंबर २०२६ : 

पंचायत समिती इंदापूर येथील रोजगार हमी योजना अंतर्गत मनरेगा विभागात कार्यरत असलेल्या तांत्रिक अधिकाऱ्यांच्या कथित दीर्घकालीन गैरहजेरीची चौकशी करून तातडीने कारवाई करावी, अशी मागणी आपली नाती, आपली माणसं ,आपला परिवार ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष इंदापूर येथील महादेव सुशीला भगवान लोंढे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे, गटविकास अधिकारी पंचायत समिती इंदापूर आणि जिल्हाधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम समन्वयक, मनरेगा यांच्याकडे तक्रार अर्जाद्वारे केली आहे.

तक्रार अर्जानुसार, मनरेगा विभागातील तांत्रिक अधिकारी दिग्विजय माकोडे हे मागील तीन महिन्यांपासून, संदेश सुतार हे दोन महिन्यांपासून आणि अमोल माने हे एक महिन्यापासून नियमितपणे कार्यालयीन कामकाजास उपस्थित राहत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित अधिकारी कार्यालयात उपस्थित राहत नसून, त्यांना नेमून दिलेल्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील मनरेगा कामांच्या साईटवरही नियमितपणे जात नसल्याचे तक्रारीत नमूद आहे.

*कामे प्रलंबित राहिल्याचा आरोप*

तांत्रिक अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे मनरेगा अंतर्गत सुरू असलेल्या वैयक्तिक लाभाच्या तसेच सार्वजनिक कामांच्या प्रक्रियेला विलंब होत असल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. ग्रामसभेच्या ठरावानुसार कामे युक्तधारा पोर्टलवर अपलोड करणे, अंदाजपत्रक तयार करणे, तांत्रिक मान्यता देणे आणि मोजमापे घेणे ही कामे वेळेत होत नसल्याने इंदापूर तालुक्यातील अनेक कामे प्रलंबित पडल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या विलंबाचा थेट परिणाम मनरेगा मजुरांवर होत असून, शेकडो मजुरांना वेळेवर रोजगार मिळण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मजुरांवर उपासमारीची वेळ येऊ शकते, अशी चिंता तक्रार अर्जातून व्यक्त करण्यात आली आहे.

*अभिलेखांची चौकशी करण्याची मागणी*

संबंधित तांत्रिक अधिकाऱ्यांची मागील चार महिन्यांची बायोमेट्रिक हजेरी, मस्टर रोल, टूर डायरी, वाहन लॉगबुक तसेच युक्तधारा पोर्टलवरील लॉगिन हिस्ट्री तपासण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच संबंधित अधिकारी प्रत्यक्षात कोणत्या ग्रामपंचायतींना व कामांच्या साईटवर गेले होते, याची ग्रामपंचायतनिहाय पडताळणी करावी, असेही तक्रारदाराने नमूद केले आहे.

विना रजा किंवा परवानगी दीर्घकाळ गैरहजर राहणे हे सेवाशिस्तीचा भंग असल्याचे सांगत, संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून नियमानुसार शिस्तभंगाची कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत वेतनाबाबत सक्षम प्राधिकाऱ्यांनी नियमांनुसार निर्णय घ्यावा, अशी मागणीही तक्रारीत करण्यात आली आहे.

*पर्यायी तांत्रिक अधिकाऱ्यांची मागणी*

मनरेगा कामांना आणखी विलंब होऊ नये यासाठी इंदापूर तालुक्यात तातडीने पर्यायी तांत्रिक अधिकारी नियुक्त करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रलंबित कामांचे अंदाजपत्रक, तांत्रिक मान्यता, मोजमापे आणि पोर्टलवरील नोंदी तातडीने पूर्ण करून मजुरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.

*२ ऑक्टोबरपासून उपोषणाचा इशारा*

या तक्रारीवर १५ दिवसांची मुदत संपून महिना उलटला म्हणून ठोस कार्यवाही न झाल्यास, २ ऑक्टोबर २०२६ रोजी महात्मा गांधी जयंतीपासून पंचायत समिती इंदापूर कार्यालयाच्या आवारात नागरिक व मनरेगा मजुरांसह शांततामय उपोषण करण्यात येईल, असा इशारा महादेव लोंढे यांनी दिला आहे.

दरम्यान, तक्रारदारांनी केलेल्या आरोपांबाबत पंचायत समिती प्रशासन किंवा संबंधित तांत्रिक अधिकाऱ्यांची अधिकृत भूमिका समोर आलेली नाही. प्रशासनाकडून चौकशी झाल्यानंतरच या आरोपांची वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.