Ticker

6/recent/ticker-posts

माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्षांची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नया अंदुरा येथे सदिच्छा भेट *

 


प्रतिनिधी अनिकेत चांदणे 

आज दिनांक 12 सप्टेंबर 2026 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नया अंदुरा येथे शाळेचे माजी विद्यार्थी व माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष *श्री. प्रकाश श्रीकृष्ण वाघ (GST Officer, Nagpur)* यांनी सदिच्छा भेट दिली.

यावेळी त्यांनी माजी विद्यार्थी संघाच्या वतीने शाळेच्या विकासासाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांची व कामांची पाहणी करून त्यांचे कौतुक केले. शाळेच्या प्रगतीसाठी माजी विद्यार्थ्यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी त्यांनी शाळेसाठी *₹5,001/- (पाच हजार एक रुपये* ) देणगी देऊन शाळेप्रती असलेली आपुलकी व ऋणानुबंध जपले.

शाळेला भेट देताना त्यांनी आपल्या बालपणीच्या व शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. आपल्या शालेय जीवनाशी निगडित असलेल्या अनेक आठवणी त्यांनी उत्स्फूर्तपणे सांगितल्या. विशेष म्हणजे, त्यांच्या विद्यार्थी जीवनात शाळेचा शालेय पोषण आहार शिजविण्याचे काम करणाऱ्या आशाताई व विमलताई आजही त्याच सेवाभावाने शाळेत कार्यरत असल्याचे पाहून त्यांनी त्यांची आस्थेने चौकशी केली. या भेटीतून शाळेशी असलेले त्यांचे जिव्हाळ्याचे नाते प्रकर्षाने जाणवले.

या प्रसंगी शाळेच्या वतीने राज्यसभेचे माजी खासदार व प्रसिद्ध पत्रकार श्री. कुमार केतकर लिखित ‘कथा स्वातंत्र्याची’ हे पुस्तक भेट देऊन श्री. प्रकाश वाघ यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी श्री. वाघ यांनी शाळेला भविष्यातही वेळोवेळी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच यावर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या माजी विद्यार्थी संघाच्या मेळाव्यास आवर्जून उपस्थित राहण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

माजी विद्यार्थ्यांच्या मनात आपल्या शाळेविषयी असलेली आस्था, जिव्हाळा आणि कृतज्ञतेची भावना या भेटीतून पुन्हा एकदा अधोरेखित झाली. त्यांच्या या प्रेमळ भेटीबद्दल व शाळेस दिलेल्या मोलाच्या सहकार्याबद्दल शाळेच्या वतीने मनःपूर्वक आभार! 🌷