Ticker

6/recent/ticker-posts

टिटवाळा कल्याण - सामाजिक बांधिलकी (आरोग्य शिबीर संपन्न )




गणेशोत्सवात सामाजिक बांधिलकीचा जागर — ओंकार मित्र मंडळातर्फे मोफत आरोग्य शिबिर

आरोग्य हिच खरी संपत्ती,आरोग्य जपा, स्वतः ला जपा - मुकेश ढगे, पोलीस निरीक्षक कल्याण तालुका 

टिटवाळा(कल्याण) : प्रफुल्ल शेवाळे 

दळवी वाडा, टिटवाळा येथील ओंकार मित्र मंडळाचा यंदाचा २४ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा होत असून, गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याची परंपरा मंडळाने यंदाही कायम ठेवली आहे. याच सामाजिक जाणिवेतून मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

महाराष्ट्र शासनाच्या ‘आपला दवाखाना’ या उपक्रमाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. परिसरातील अनेक ज्येष्ठ नागरिकांसह तरुण-तरुणींनीही आरोग्य तपासणी करून घेतली. शिबिरात संपूर्णपणे मोफत आरोग्य तपासणी, मोफत औषधांचे वाटप तसेच विविध रक्त तपासण्या करण्यात आल्या.bd

यावेळी कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. मुकेश ढगे यांनी मंडळाला भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले. मंडळाच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करताना त्यांनी स्वतःचीही आरोग्य तपासणी करून घेतली.

यावेळी नागरिकांना मार्गदर्शन करताना श्री. ढगे यांनी “आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. आरोग्य हीच खरी संपत्ती असून, वेळोवेळी आरोग्य तपासणी करून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या,” असा आरोग्यदायी कानमंत्र दिला.

गणेशोत्सव म्हणजे केवळ उत्सव आणि धार्मिक कार्यक्रम नसून, समाजासाठी काहीतरी करण्याची संधी आहे, या भावनेतून ओंकार मित्र मंडळाने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले. भक्तीला सामाजिक सेवेची जोड देत मंडळाने ‘गणपती बाप्पा मोरया’सोबत ‘आरोग्य जपा, निरोगी राहा’ असा सकारात्मक संदेश समाजापर्यंत पोहोचविला.

या आरोग्य शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी ओंकार मित्र मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ‘आपला दवाखाना’चे वैद्यकीय अधिकारी डॉ. दिव्या कातकरी, डॉ. स्वप्नील दिघे, डॉ भूषण गोरेकर व कर्मचारी तसेच सहकार्य करणाऱ्या सर्वांचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.

यावेळी रुग्ण सेवा पुरस्कार मानकरी धनंजय सोनकुळे, पत्रकार प्रफुल्ल शेवाळे, ओंकार गणपती मित्र मंडळ चे अध्यक्ष सुधीर भास्कर, मनीष दळवी यांचे विशेष सहकार्य लाभले.