ग्रामीण शिक्षणाचा दर्जा उंचावल्याशिवाय शेतकरी, शेतमजूर आणि बहुजन समाजाचा विकास शक्य नाही : शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे
गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी
जिल्हा परिषद शाळांमध्ये खऱ्या अर्थाने गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची क्षमता असून, आज प्रशासकीय सेवेत कार्यरत असलेल्या वर्ग एक व वर्ग दोनच्या अनेक अधिकाऱ्यांच्या शैक्षणिक प्रवासाचा इतिहास तपासल्यास त्याचा प्रत्यय येतो. जिल्हा परिषद शाळा ही गावविकासाची गुरुकिल्ली असून, ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा आणि गुणवत्ता सुधारल्याशिवाय शेतकरी, शेतमजूर आणि बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास होऊ शकत नाही, असे प्रतिपादन प्राथमिक जिल्हा शिक्षणाधिकारी प्रा.विठ्ठल भुसारे यांनी केले. वापटी-कुपटी येथे आयोजित ‘जागर शिक्षणाचा’ या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष बंडूभाऊ इंगोले होते. प्रमुख अतिथी म्हणून उपशिक्षणाधिकारी श्रीकृष्ण बिरासदार,गटशिक्षणाधिकारी श्रीकांत माने, केंद्रप्रमुख घोडकेखडसे मॅडम,राज्यात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या साखरा जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापकराजु महाले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय खर्डेकर, सरपंच अशोक टाके, तसेच तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख उपस्थित होते.
५२ विद्यार्थ्यांपासून राज्यात प्रथम क्रमांकापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास!
यावेळी साखरा जिल्हा परिषद शाळेच्या यशोगाथेने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. मुख्याध्यापक महाले यांनी केवळ ५२ विद्यार्थी आणि दोन मोडकळीस आलेल्या खोल्यांच्या परिस्थितीत शाळेची जबाबदारी स्वीकारली. मात्र, जिद्द, मेहनत, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि ग्रामस्थांच्या सहकार्याच्या बळावर त्यांनी या शाळेला राज्यात प्रथम क्रमांकापर्यंत पोहोचविले. त्यांच्या संघर्षाचा हा प्रवास उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू आणणारा ठरला.
आज साखरा शाळा सुमारे १,५०० विद्यार्थी आणि ५२ कर्मचारी यांच्या सहभागातून आदर्श शैक्षणिक कार्य करीत आहे. गावकऱ्यांनी दिलेले सहकार्य, लोकवर्गणी आणि शिक्षकांची समर्पित वृत्ती यामुळेच हे यश शक्य झाल्याचे महाले यांनी सांगितले. जिल्ह्यातील इतर शाळांनीही या कार्यातून प्रेरणा घेऊन गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दिशेने वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी केले.
शिक्षकांनी सामाजिक दायित्व ओळखावे!
जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थीगळती ही केवळ परिस्थितीचा परिणाम नसून, काही अंशी नकारात्मक विचारसरणीचेही प्रतिबिंब आहे. जिल्हा परिषद शाळांबद्दल सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी शाळा सुरू होण्यापूर्वी आणि शाळा सुटल्यानंतरही आत्मचिंतन करावे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासोबतच सामाजिक दायित्व कसे निभावता येईल, याचा विचार करावा. शिक्षक म्हणून शेतकरी, कष्टकरी आणि बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी योगदान देण्याची मोठी संधी मिळते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
ग्रामस्थ आणि शिक्षकांच्या एकजुटीतून आदर्श शाळा घडविणार!
अध्यक्षीय भाषणात बंडूभाऊ इंगोले यांनी जिल्हा शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे आणि साखरा शाळेचे मुख्याध्यापक महाले यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन वापटी-कुपटी येथील जिल्हा परिषद शाळेलाही गुणवत्तेच्या दिशेने पुढे नेण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले. यासाठी ग्रामस्थ आणि शिक्षक यांनी एकत्रितपणे पुढाकार घेतल्यास आदर्श शाळा उभारणे निश्चितच शक्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी श्रीकांत माने यांनी केले. संचालन अनासाने मॅडम यांनी केले, तर सुनील मुंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
ग्रामीण शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी एकत्र येण्याचा संदेश देणारा हा ‘जागर शिक्षणाचा’ कार्यक्रम प्रेरणादायी ठरला. कार्यक्रमाच्या यशवितेसाठी मुख्याध्यापक सर्व शिक्षक गावकरी व विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले.





Social Plugin