Ticker

6/recent/ticker-posts

कळंबोलीसह इतर शहरांत पाण्याची तीव्र टंचाई.



कळंबोली प्रतिनिधी: .अवधूत साळुंखे,

कळंबोलीसह इतर शहरांत पाण्याची तीव्र टंचाई; आश्वासने कागदावरच

कळंबोली : कळंबोलीसह परिसरातील अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी तासन्‌तास प्रतीक्षा करावी लागत असून, दैनंदिन जीवनावर त्याचा मोठा परिणाम होत आहे.

सिडकोकडून अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाण्याच्या समस्येमुळे स्थानिक व्यावसायिक तसेच नोकरी करणाऱ्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. पाण्यासाठी नागरिकांना आपली दैनंदिन कामे बाजूला ठेवून प्रतीक्षा करावी लागत आहे.

निवडणुकीच्या काळात नागरिकांना नियमित आणि मुबलक पाणीपुरवठ्याची आश्वासने देण्यात आली होती. मात्र, निवडणुका संपल्यानंतर ही आश्वासने कागदावरच राहिल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि संबंधित प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये रोष वाढताना दिसत आहे.

पाणी हा नागरिकांच्या मूलभूत गरजांपैकी एक असताना वारंवार निर्माण होणाऱ्या या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा कधी निघणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.