बुलढाणा, चिखली मन्सूर शहा. महाराष्ट्र ग्रामीण न्युज
चिखली तालुक्यात यावर्षी पर्जन्यमानात झालेली कमतरता लक्षात घेता जलाशय, नद्या, तलाव, कालवे तसेच कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांमध्ये अपुरा जलसाठा उपलब्ध आहे. आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन तालुक्यातील सर्व जलस्रोतांमधून होणाऱ्या अनधिकृत पाणी उपशास तात्काळ प्रतिबंध करण्यात आला आहे.
अनधिकृत पाणी उपशावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी तहसील कार्यालय, चिखली यांच्या वतीने विशेष भरारी पथके गठित करण्यात आली आहेत. या पथकांमध्ये मृद व जलसंधारण विभाग, महावितरण, पोलीस प्रशासन तसेच महसूल व ग्रामपंचायत विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
भरारी पथकांकडून तालुक्यातील विविध जलप्रकल्पांची नियमित तसेच अचानक तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीदरम्यान अनधिकृत पाणी उपसा आढळल्यास संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६ तसेच केंद्रीय विद्युत कायदा, २००३ मधील तरतुदींनुसार कारवाई करण्यात येणार आहे.
नियमबाह्य पाणी उपसा करणाऱ्यांचे पंप संच जप्त करणे, दंड आकारणे, वीजपुरवठा खंडित करणे तसेच आवश्यकतेनुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे जलस्रोतांमधून अनधिकृतपणे पाणी उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची करडी नजर राहणार आहे.
भविष्यातील पिण्याच्या पाण्याची संभाव्य टंचाई लक्षात घेता नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी कोणत्याही जलस्रोतामधून अनधिकृतपणे पाण्याचा उपसा करू नये. जलस्रोतांचे संवर्धन व उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन चिखली तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.





Social Plugin