Ticker

6/recent/ticker-posts

पाटणसह तालुक्यात मुसळधार पर्ज्यन्यवृष्टी

पाटण बसस्थानकात व नेरळे गावात घरात ओढ्याचे पाणी शिरले दुकानदारांचे मोठे नुकसान,  प्रशासन अलर्ट मोडवर

पाटण, (दिनकर वाईकर)

पाटण शहरासह तालुक्यात शनिवारी   रात्रीपासून जोरदार संततधार पर्ज्यन्यवृष्ठी सुरू असून रविवारी  अक्षरक्षा पावसाने झोडपून काढल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.  अतिवृष्टीमुळे  शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पाटण ते मोरगिरी रस्त्यावर नेरळे येथे व पाटण येथे ओढ्याला आलेले पुराचे पाणी नवीन बसस्थानकात व परिसरातील  दुकान गाळ्यात अचानक पाणी  शिरल्याने दुकानदारांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील अनेक रस्त्यांवर ल ओढे, नाल्यांचे पाणी आल्याने काही काळ वाहतूक ठप्प होती. कोयना नदीवरील मुळगाव पुलाला पाणी टेकल्याने हा पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तालुक्यातील किल्ले मोरगिरी येथे 1, पेठ शिवापूर 1, निगडे 1, दाढोली 1, गावडेवाडी 1 अशा पाच ठिकाणी अंशत घरांची  पडझड झाली आहे. 

        दरम्यान  तहसीलदार अनंत  गुरव यांच्यासोबत तलाठी  पांडुरंग शिंदे  यांनी नेरळे, पाटण, संगमनगर, कोयना, मुळगाव पुल या ठिकाणी पाहणी केली. तर तलाठी, कोतवाल, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

       अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पाटण तालुक्याचे प्रशासनही अलर्ट मोडवर असून पाटणचे उपविभागीय अधिकारी सुनील गाढे, तहसीलदार अनंत गुरव , पाटण तालुक्याच्या विविध भागात भेटी देऊन पाहणी केली. तसेच  चार ते पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा वेधशाळेने दिला असल्याने नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी सुनील गाढे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार अनंत गुरव यांनी केले आहे.

           पाटणसह परिसरात गेल्या तीन दिवसापासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. शनिवारी  रात्रीपासून व रविवारी सकाळीपासून पाटणसह परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. या अतिवृष्टीमुळे  कोयना, पाटण, चाफळ, मोरगिरी, तारळे, ढेबेवाडी आदी बहुतांशी विभागात  नद्या, नाले, ओढे यांचे पाणी शेतात घुसल्याने शेती पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी स्थानिक ओढ्यांनी या अतिवृष्टीतील अमर्याद पाण्यामुळे आपला मुख्य प्रवाह बदलल्याने स्थानिक शेतीसह शेतजमीनींचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.पाटण ते मोरगिरी या रस्त्यावर नेरळे येथे ओढ्याचे पाणी आल्याने स्त्यावर व येथील घरात गुडघाभर सुमारे एक तास पाणी होते.  या ठिकाणी तहसीलदार अनंत गुरव यांनी तातडीने  भेट देऊन पाहणी केली. पाऊस असाच सुरू राहिला तर येथील कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना तलाठी व ग्रामसेवक यांना दिल्या आहेत. तर नेरले येथील निवृत्ती राघू एकावडे, ज्ञानदेव राघू एकावडे, संतोष राघू एकावडे, एकनाथ सिताराम माने, ज्ञानदेव सिताराम माने, तुकाराम लक्ष्मण मोरे, सुरेश लक्ष्मण सिंह मोरे, शांताबाई आनंदा मोरे यांच्या राहत्या घरात व जनावरांचा गोठ्यात पाणी शिरले होते. कोयना विभागातील  हेळवाक येथील मेढेंघर व नेचेल येथील जोडणाऱ्या फरशी पुलावर काजळी नदीचे पाणी आल्याने काही काळ येथील वाहतूक ठप्प होती. अनेक ठिकाणी  पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक ठप्प झाली तर काही ठिकाणी साकव, छोटे पूल, फरशी पूल आदी सार्वजनिक मालमत्तांचेही नुकसान झाले आहे.

           पाटण शहरात  नवीन बसस्थानक परिसरासह दुकानगाळ्यात ओढ्याचे पाणी शिरल्याने  दुकानदारांची चांगलीच धावपळ उडाली. अचानक पाणी घुसल्याने दुकानातील सहित्य भिजून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.  जोरदार पावसामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. तर कोयना नदीवरील मुळगाव पुलाला पाणी टेकले आहे. पाऊस असाच सुरू राहिला तर रात्रीपर्यंत हा पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.दरम्यान पाउस कमी होताच नेरळे व इतर ठिकाणी ओढ्यावर आलेल्या माती व दगड तातडी काढण्याचे काम रात्री उशिरापर्यंत चालू होते  काही काळाने या ठिकाणी वाहतूक सुरळीत चालू झाली होती 



 हवामान खात्याने चार ते पाच दिवस रेड अलर्ट जारी केला आहे. शिवाय पाटण तालुक्यात सध्या विविध ठिकाणी मुसळधार अतिवृष्टी होत असून धबधबे मोठ्या प्रमाणात ओसंडून वाहू लागले आहेत. हे धबधबे पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात बाहेरून येत आहेत. पर्यटकांनी धबधब्यांच्या जवळ न जाता लांबूनच पहावे व हुल्लडबाजी करू नये व आपली काळजी घ्यावी, असे आवाहन उपविभागीय अधिकारी सुनील गाडे व तहसीलदार अनंत गुरव यांनी केले आहे.

..तर आपत्कालीन विभागाशी संपर्क साधा

पाटण तालुक्याच्या विविध भागात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे ओढे व नाल्यांना मोठया प्रमाणात पाणी येत असून नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.  आगामी चार दिवस असेच पावसाचे प्रमाण राहणार असून अनेक ठिकाणी दरडी अथवा दरडी कोसळण्याच्या घटना घडतात त्या ठिकाणच्या नागरिकांनी दक्षता घ्यावी. तसेच पुराचे पाणी रस्त्यावर आल्यास कोणतीही अनुचित घटना घडल्यास तातडीने स्थानिक पोलीस पाटील, कोतवाल, तलाठी, महसूल विभाग व आपत्कालीन कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार अनंत गुरव यांनी केले आहे