Ticker

6/recent/ticker-posts

कोयना धरण परिसरात दमदार पाऊस



कोयन धरणात ३८.२८ टीएमसी पाणीसाठा. चोवीस तासात ३.२९ टीएमसी पाणीसाठा, पाणीउंचीत ५.६ फुटाने वाढ.

 पाटण, (दिनकर वाईकर) 

शनिवारी रात्रीपासून पाटण तालुक्यासह कोयना धरणांतर्गत विभागातील कोयना, नवजा, महाबळेश्वर परिसरात दमदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे कोयनेसह स्थानीक अन्य छोट्या मोठ्या नद्या, नाले, ओढे ओसंडून वाहत आहेत. मागील चोवीस तासात धरणातील पाणीसाठ्यात ३.२९ टीएमसीने वाढ झाली असून आता धरणात एकूण ३८.२८ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणात सध्या प्रतिसेकंद सरासरी ६४,०५८ क्युसेक्स पाण्याची आवक होत असून पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. जोरदार पाऊस पाहता प्रशासनाकडून दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

          कोयना धरणांतर्गत कोयना, नवजा, महाबळेश्वर परिसरातही मुसळधार पाऊस पडत असून धरणातील पाणीसाठा तथा झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. धरणात सध्या ३८.२८ टीएमसी उपलब्ध तर ३३.१६ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. धरणात सध्या प्रतिसेकंद सरासरी ६४,०५८ क्युसेक्स पाण्याची आवक होत असून पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. १०५.२५ टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेले हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अद्यापही ६६.९७ तब्बल टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे.    मागील चोवीस तासात धरणाच्या पाणीसाठ्यात ३.२९ टीएमसीने तर पाणी उंचीत ५.६ फूट वाढ झाली आहे. सध्या समुद्रसपाटीपासून धरणाची पाणी उंची २०९१.२ फूट असून जलपातळी ६३७.३८८ मीटर इतकी आहे. शनिवार संध्याकाळी पाच ते रविवार संध्याकाळी पाच या चोवीस तासात व आजपर्यंतचा एकूण पाऊस कोयना २२० मिलिमीटर ( १९१७ ), नवजा ३०८ मिलिमीटर ( २२१० ) तर महाबळेश्वर १५८ मिलिमीटर ( १७०७ ) मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणात सध्या एकूण ३६.३७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.