Ticker

6/recent/ticker-posts

पुसेगावला खिलार जनावरांचे प्रदर्शन



आज  निवड होणार , चार गटांत निवड स्पर्धा


पुसेगाव दि .[प्रतिनिधी ] 

येथील श्री सेवागिरी महाराज यात्रेनिमित्त जातिवंत खिलार जनावरांचे प्रदर्शन होणार आहे. यात आज( गुरुवारी) नोंद झाली असून शुक्रवारी (ता. ३) बक्षिसपात्र जनावरांची निवड केली जाणार आहे. राज्यातील खिलारप्रेमींनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानचे मठाधिपती श्रीमहंत सुंदरगिरी महाराज आणि ट्रस्टचे अध्यक्ष डॉ . सुरेश जाधव केले आहे.

खिलारच्या उपजातीनुसार खिलार काजळी बैल, खिलार काजळी गाय, खिलार कोसा बैल, खिलार कोसा गाय या चार मुख्य गटांत ही निवड स्पर्धा होईल. प्रत्येक गटात जुळीक, सहा दाती, चार दाती, दोन दाती, आदत (वर्षांवरील), आदत (वर्षाखालील) असे वयोमानानुसार सहा उपगट  तयार केले आहेत. प्रत्येक उपगटात निवड झालेल्या प्रथम चार विजेत्या जनावरांच्या मालकांना अनुक्रमे सात हजार, पाच हजार, तीन हजार, दोन हजार रुपये बक्षीस म्हणून देण्यात येईल. चारही मुख्य गटांतील चॅम्पियन जनावराच्या मालकाला २५ हजार रुपये व श्री सेवागिरी चषक देण्यात येईल.

सातारा-पंढरपूर मार्गावरील यात्रा स्थळावर हे प्रदर्शन होईल. स्पर्धा फक्त खिलार जनावरांच्या होतील. पंचांचा निर्णय अंतिम राहील. प्रदर्शनाच्या यशस्वितेसाठी ट्रस्टचे अध्यक्ष डॉ . सुरेश जाधव, विश्वस्त रणधीर जाधव, बाळासाहेब ऊर्फ संतोष जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव यांनी विशेष परिश्रम घेत आहेत.

 कर्नाटक, महाराष्ट्राच्या  कानाकोपऱ्यातून येणाऱ्या जातिवंत खिलार जनावरांचे प्रदर्शन  आज .३ जानेवारीला पुसेगावमध्ये आहे. प्रदर्शनात देखणी व जातिवंत जनावरे प्रत्यक्षात पाहण्याची पर्वणी खिलारप्रेमींना पाहायला मिळेल.--डॉ . सुरेश जाधव, अध्यक्ष श्री सेवागिरी ट्रस्ट

 :प्रदर्शनाची वैशिष्ट्ये

■ जातिवंत खिलार प्रजातीचे संवर्धनासाठी आयोजन

■ महाराष्ट्रासह कर्नाटकातील नामवंत जनावरांचा सहभाग

■हजारोंच्या संख्येने खिलारप्रेमींची हजेरी

■ निवडीवेळी जागेवर निकाल                       

  ■ पाच लाखांहून अधिक रुपयांची बक्षिसे व चषक