साहेबराव अंभोरे @ग्रामीण प्रतिनिधी
दि.18 जानेवारी 2025 रोजी इयत्ता सहावी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नवोदय परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून प्रत्येक जिल्हा निहाय गुणवत्ता यादी व निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
यावर्षी बुलढाणा जिल्ह्यातून साधारणतः 15000 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. त्यापैकी गुणवत्ता यादीत झळकणारे फक्त 80 विद्यार्थीच पी एम श्री जवाहर नवोदय विद्यालय शेगाव साठी प्रवेशासाठी पात्र असतात. त्या प्रवेश पात्र विद्यार्थ्यांमध्ये अकोला ठाकरे केंद्र लोणीगवळी पं.स. मेहकर येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणारी विद्यार्थिनी कु.भक्ती ज्ञानेश्वर गायकवाड हिने आपले स्थान निश्चित केले आहे. मागील वर्षी या शाळेतील कु.शरयू संजय लखाडे ही विद्यार्थिनी नवोदय प्रवेशासाठी पात्र ठरली होती. यावर्षी भक्तीने ही यशाची परंपरा कायम ठेवत शाळेचे नाव उंचावले आहे. विशेष म्हणजे भक्तीने शाळेचा नियमित अभ्यास पूर्ण करून नवोदय प्रवेश सुद्धा निश्चित केल्याबद्दल तिचे विशेष कौतुक करण्यात येत आहे. आता ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा सुद्धा गुणवत्तेच्या बाबतीत कमी नाहीत हेच या विद्यार्थ्यांच्या यशा मधून सिद्ध होते.
TET ,TAIT ,D.ed B.ed.NET SET, PHD अशी उच्च गुणवत्ता प्राप्त शिक्षक आता जिल्हा परिषद शाळेमध्ये आल्यामुळे त्यांचे विद्यार्थी देखील स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होताना दिसत आहेत. नवीन शैक्षणिक धोरणानुसार क्षमताधिष्ठित व कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम जिल्हा परिषद व मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये राबविला जाणार आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून CBSE बोर्ड इयत्ता पहिली पासून जिल्हा परिषद शाळांमध्ये लागू होत आहे. त्यामुळे पालकांनी सुद्धा महागड्या शिक्षणाच्या मागे न लागता व आर्थिक ओढाताण करून न घेता आपल्याच गावातील जिल्हा परिषद शाळेतच आपल्या पाल्याचा प्रवेश घेतला पाहिजे. भक्तीच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री सुनील कुंभार, उपाध्यक्ष रामेश्वर काळे, सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य अकोला ठाकरे, सरपंच परसराम ठाकरे, उपसरपंच तुळशीदास ठाकरे, मुख्याध्यापक गजानन केळे, शिक्षक विश्वनाथ पायघन ,संजू अंभोरे ,रेखा कोल्हे, अनुपमा मोरे व तिचे वर्गशिक्षक व मार्गदर्शक ज्ञानेश्वर गायकवाड यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.





Social Plugin