तालुका प्रतिनिधी मारोती/ गेवराई
गेवराई (बीड):-
संत मंडळीचे महाराष्ट्रावर अनंत उपकार आहेत. ही भूमी संतांची आहे. जो पर्यंत चंद्र, सूर्य आहेत तोपर्यंत या महाराष्ट्राच्या मातीत संतांचे विचार अजरामर राहणार आहेत. याच भूमीमध्ये थोर संत नगद नारायण महाराजांनी वास्तव्य केलेले असून संत परंपरेतील जुनी गादी म्हणून नगद नारायण महाराजांच्या गादीचा उल्लेख आहे. तर जो भक्त संत नगदनारायण महाराजांची मनोभावे सेवा करतो त्याला नगद फळ मिळते. तसेच संत नगद नारायण महाराजांमुळे बीड जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी भक्तीचा ध्वज दिमाखात फडकत आहे. आणि त्यांच्या आशिर्वादाने अनेकांचे कोटकल्याण झालेले आहे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले यांनी व्यक्त केले.
गेवराई येथील संत गजानन महाराज, मंदिर प्रांगणात स्वानंद सुखनिवासी संत कुलभूषण महात्मा श्री नगदनारायण महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त वै.महादेव महाराज यांच्या कृपेने, महंत शिवाजी महाराज यांच्या शुभहस्ते व ह.भ.प.संभाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या भव्य कीर्तन महोत्सवाची मंगळवार दि.११ मार्च रोजी ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले यांच्या अमृततुल्य काल्याचे कीर्तनाने उत्साहात सांगता झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी पंचक्रोशीतील संत, महंत, टाळकरी, वारकरी, चोपदार , गायणाचार्य, मृदंगाचार्य, भजनी मंडळ, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार बांधव तसेच महिला व पुरुष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना ह.भ.प. बोधले महाराज म्हणाले की, संताची पुण्यतिथी का साजरी करावी तर संतांनी लोककल्याणासाठी कोणती मूल्य घेऊन जगले. याची महती तुम्हा आम्हाला व्हावी यासाठी पुण्यतिथी साजरी केली जाते. ज्यांनी समाजातील उपेक्षित घटक आपल्या कार्याचा केंद्रबिंदू मानला ती माणसं चंद्र , सूर्य आहे तोपर्यंत लोकांच्या मनावर आधिराज्य करत असतात विविध अंगाने प्रतिकूलता निर्माण झाल्यानंतर आपली साधनेवरची ईश्वरनिष्ठा, गुरुनिष्ठा, धर्मनिष्ठा ही या साधुसंतांनी जपलेली आहे. समाजाचे कल्याण करण्यासाठी आपले जीवन चंदनाप्रमाणे कसे झिजवले हे साधू संतांच्या जीवन चरित्रातून आपल्याला धडे मिळत असतात असेही शेवटी बोलताना त्यांनी सांगितले. कीर्तनानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तर या भव्य कीर्तन महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी संयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आठ दिवस मोठे परिश्रम घेतले आहेत.





Social Plugin