शिरुर, दि. 15 मे 2025— शिरुर शहरातील प्रमुख चौकांमध्ये ट्राफिक सिग्नल/स्टॉप लाईट बसविण्याबाबत मागील चार महिन्यांपासून पाठपुरावा सुरू असूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे नागरी सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर ठरणाऱ्या या मुद्द्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत, मातोश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजीत आंबेकर यांनी नगरपरिषदेच्या विरोधात बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.
या संदर्भातील लेखी निवेदन आज शिरुर नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी राहुल पिसाळ यांना देण्यात आले. यामध्ये सांगण्यात आले आहे की, शहरातील वाहतुकीची वाढती समस्या, नियमांचे उल्लंघन व अपघाताच्या घटना लक्षात घेता ट्राफिक सिग्नल लावणे अत्यावश्यक झाले आहे. यासाठी दिनांक १४ जानेवारी २०२५ रोजी नगरपरिषदेकडे लेखी मागणी करण्यात आली होती.मात्र, आजतागायत कोणतीही कारवाई न झाल्याने ही बाब खेदजनक असून नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारी आहे, असे मातोश्री प्रतिष्ठानकडून सांगण्यात आले.
या पार्श्वभूमीवर, जर पुढील १५ दिवसांत ठोस निर्णय घेऊन कार्यवाही सुरू झाली नाही, तर दिनांक १ जून २०२५ पासून नगरपरिषद कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.
या आंदोलनामुळे शहरातील वाहतूक समस्येला प्रशासनाने गांभीर्याने घेतले जाईल का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.





Social Plugin