Ticker

6/recent/ticker-posts

दुधगांव मध्ये पाणीपुरवठा खंडित ; पाण्यासाठी महिलांची वणवण.



दुधगांव-प्रतिनिधी-निखिल नलवडे.

या गावामध्ये वारणा नदी बारमाही दुथडी भरून वाहते. परंतु नदी उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था या गावात झाली आहे. गेल्या १० दिवसापासून पाणी पुरवठा खंडित झाला आहे. गावामध्ये काही ठिकाणी नवीन पाईपलाइनचे काम सुरु असल्याने काहीठिकाणी खोदकाम केले आहे. त्यामुळे पाईप लाईन लिकेज झाल्याने वार्ड क्र. १मध्ये पाणी पुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.  लिकेजचे काम सुरु आहे परंतु अद्याप ते पूर्ण झाले नसल्याने पाणी पुरवठा अजूनही सुरळीत झाला नाही. पाणी प्रश्नासंदर्भात महिला ग्रामपंचायत मध्ये विचारणा करायला गेल्यास तिथे कोणीही हजर न्हवते. तद्नंतर त्यांना समाधानकारक उत्तर न देता त्यांना उडवा-उडवीची उत्तरे देण्यात आल्याने नागरिकांचा जास्तच संताप दिसून आला. ग्रामपंचायतचे पाणी पुरवठ्याकडे पूर्ण दुर्लक्ष असल्याचे नागरिकांचे मत आहे.

               गेल्या दोन दिवसांपासून ग्रामपंचायतीने टँकरने दुषित पाणीपुरवठा केला जात आहे, आणि विशेष म्हणजे ते पाणी पिण्यायोग्य आहे कि नाही याकडे ग्रामपंचायतिने प्रामुख्याने लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा या दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांना गावातील लोकांना तोंड द्यावे लागेल. टँकर ने पुरवले जाणारे पाणी व अपुरा पाणीपुरवठा  यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासन व जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग यांनी लक्ष घालून यातून मार्ग काढावा अशी ग्रामस्थांमधून मागणी होत आहे. पाणी पुरवठा सुरळीत व पिण्यायोग्य न झालेस ग्रामपंचायतीस टाळे लावण्याचा इशारा यावेळी महिलांनी दिला आहे. यावेळी उपसरपंच गिरीश पाटील यांनी दोन दिवसात पाणी पुरवठा सुरळीत करू असे आश्वासन दिले आहे.