Ticker

6/recent/ticker-posts

जलतारा: एक अभियान, एक जबाबदारी – जलसमृद्ध गावांसाठी एकत्रित वाटचाल



मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले

‘वत्सगुल्म जलतारा स्पर्धा २०२५’ ही केवळ स्पर्धा न राहता, वाशिम जिल्ह्याच्या जलभूषेसाठी उभे राहिलेले एक व्यापक लोकचळवळीचे प्रतीक ठरली आहे. या स्पर्धेने जिल्ह्यातील अनेक गावांना जलसंधारणाबाबत नव्याने विचार करायला लावले. अर्ज केलेल्या गावांनी जलतारा उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि आता जिल्ह्यातील विविध अधिकाऱ्यांनी या अर्जदार गावांना दत्तक घेतले असून त्यामध्ये शंभर टक्के जलतारे पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे.

या गावांमध्ये जलतारे, शोषखड्डे, गाळकाढणी, कंटूर बांधणी, बंधारे यांसारख्या उपाययोजना जलदगतीने राबविल्या जात आहेत. यामागचा उद्देश फक्त पाण्याचा साठा वाढवणे नव्हे, तर ग्रामीण भागामध्ये शेती, पशुपालन, रोजगार आणि पर्यावरण समतोल साधून संपूर्ण आर्थिक स्वावलंबनाकडे वाटचाल करणे हा आहे. जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांच्या मार्गदर्शनाखाली ‘जलतारा’ उपक्रम जिल्ह्यातील प्रत्येक गावापर्यंत पोहचवण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

पाण्याचा थेंब थेंब साठवून मोठं जलसाठं तयार करता येतं. हेच या उपक्रमाने दाखवून दिलं आहे. पूर्वी पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली शेती आता वर्षभर सुजलाम्-सुफलाम् बनू शकते. भूजल पुनर्भरणामुळे विहिरींना पाणी मिळतं, शेतकरी बहुपीक शेतीकडे वळतो, पशुधन जोपासले जाते आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतात. हे सर्व जलतारा योजनेच्या माध्यमातून शक्य होत आहे.

या उपक्रमात प्रशासन, ग्रामपंचायती, स्वयंसेवी संस्था, शाळा आणि सामान्य ग्रामस्थ यांचा समन्वय महत्त्वाचा ठरत आहे. जिल्ह्यातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष गाव भेटी घेतल्या असून, ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना प्रोत्साहित केले आहे. लोकसहभाग, इच्छाशक्ती आणि योग्य नियोजन हे या यशाचे गमक आहे.

‘वत्सगुल्म जलतारा स्पर्धा’च्या निमित्ताने सुरू झालेली ही जलचळवळ आता अधिक व्यापक होत आहे. फक्त स्पर्धेसाठी नव्हे, तर पुढील पिढ्यांसाठी शाश्वत जलनियोजनाची ही जबाबदारी म्हणून ही चळवळ उभी राहत आहे. जलतारा म्हणजे केवळ योजना नाही, तर गावागावातील जीवनधारा पुन्हा प्रवाही करण्याचा एक ध्यास आहे.

आपण सर्वांनी एकत्र येऊन हे कार्य केल्यास “प्रत्येक गाव जलतारा – प्रत्येक शेत पाण्याने समृद्ध” हे स्वप्न लवकरच साकार होईल. चला, जलताराच्या माध्यमातून केवळ पाणीच नाही तर आपलं भविष्यही सुरक्षित करूया. – यासिरोद्दिन काझी, जिल्हा माहिती अधिकारी, वाशिम