*बालासाहेब शिंदे*
ग्रामीण भागात दरवर्षी भरणाऱ्या व मोठ्या प्रमाणात गर्दी होणाऱ्या जत्रा व यात्रांचा हंगाम सध्या सुरू असल्याने गावखेड्यात सध्या उत्साहाचे वातावरण दिसत आहे. कोरोना काळात रद्द करण्यात आलेला हा यात्रोत्सव गत ४-५ वर्षीपासून सुरू करण्यात आल्याने ग्रामीण भागातील समाजव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असलेल्या ग्रामजत्रांची पूर्वतयारी सुरू असल्याने ग्रामीण जीवनातला उत्साह परतला आहे.
सध्या अतनूर येथे ग्रामदैवत श्री.काशी विश्वनाथ महाराज व संजिवनी समाधी घेतलेले श्री.संत घाळेप्पा स्वामी महाराज यांच्या १४९ वा. दि.२८ एप्रिल पासून अखंड हरिनाम सप्ताह व महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकार तसेच गाथा पारायण व ग्रामजत्रेला सुरुवात झाली. या दिवसांपासून एक सप्ताह अखंड हरिनाम सप्ताह महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार यांचे कीर्तन व भागवत कथा ऐकण्यास मिळणार आहे.
आधुनिक युगात प्रत्येक माणसाच्या हातात मोबाईल दिसू लागला, प्रत्येक घरात टीव्ही पोहोचला असला तरी आजही महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांत ग्रामदैवत अथवा ग्रामदेवीच्या नावाने होणारी जत्रा प्रमुख आकर्षण असते. अशा जत्रा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भरतात. वर्षातून एकदा गावात होणारी जत्रा म्हणजे लहानांपासून थोरांपर्यंत एक पर्वणीच असते. या जत्रेत हौसे, नौसे, गौसे आलेले असतात. जत्रेनिमित्त वर्षभर शेतात राबणाऱ्या कष्टकऱ्यांना विरंगुळा मिळतो. घरातील उपयुक्त संसारोपयोगी वस्तूंची खरेदी होते. बायका पोरांसह चार घटका घालविता येतो. महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांत भरणाऱ्या जत्रा ग्रामसंस्कृतीचा अविभाज्य घटक बनल्या आहेत. मानवी स्वभाव, इच्छा, कला, व्यवहार आदींचे दर्शन घडवणाऱ्या जत्रा आपल्या संस्कृतीची ओळख करून देतात, महाराष्ट्राच्या संस्कृतीचे मूळ खेड्यात आढळते. ज्या ठिकाणी जत्रा भरते, त्या परिसरातील गावांतील लोक पूर्वी बैलगाडीने जत्रेला जात असत, परंतु काळाच्या ओघात ही पद्धत बदललेली दिसते. सर्वसाधारणपणे मार्च, एप्रिल, मे महिन्यात जत्रांना वेग येतो. मोठ्या गावांमधील जत्रा व्यवस्थापनाचे धडे घालून देणारी उदाहरणे असतात. या जत्रांची तयारी गावकरी महिनाभरापासून करत असतात, जत्रेचे नियोजन यात्रा कमिटी करते. जत्रेत गरगरा फिरणारे चक्री पाळणे व पोटात भीतीचा गोळा आणणारे भिरभिरे, त्यात मजेत झुलणारी मुले, त्यांना खाली उभारून टाटा करणारे अनेक हात हे दृश्य मनात घट बसते. या काळात स्टॉल धारकांचा चांगला व्यवसाय होतो. जत्रेतील मुख्य आकर्षण असते ते म्हणजे रात्रीच्या वेळी सादर होणारा तमाशा. तो पाहण्यासाठी खास करून काही लोक जत्रेला येतात. तमाशाला एकेकाळी भरभराटीचे दिवस होते. मात्र, सध्या तमाशाच्या तंबूचा एक एक खांब आज टीव्ही चॅनलच्या वाढत्या अतिक्रमणामुळे निखळू लागला आहे, आज घडीला तमाशा फडांची संख्या कमी होताना दिसत आहे.
महिलांची गर्दी वाढली....
ग्रामीण भागातील यात्रेला माहेरवाशीन येत असते. सध्या महाराष्ट्र सरकारने महिलांना तिकिटामध्ये ५० टक्के सवलत दिली आहे. यामुळे बसस्थानकात महिला प्रवाशांची संख्या अधिक वाढल्याचे चित्र दिसून येते.अतनुरात माहेरवाशीनेचा मेळा जमला आहे. येथे २८ एप्रिल पासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथा ऐकण्याकरिता येथील माहेरवाशीने मोठ्या संख्येने एकत्रित येऊन मोठा जुन्या-नव्या मैत्रीणीचा स्नेहमेळा, गाठी-भेटी चा मेळा भरविला आहे.यानिमित्ताने ४०- ६० वर्षापुर्वीची आठवण होताना दिसत आहे. यामुळे गावामध्ये चैतन्य व उत्सवाचे वातावरण आहे.
Social Plugin