नवीन जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या प्रारूप रचना मसुद्यात गंभीर विसंगती आढळत असून त्या दुरुस्त करून स्थानिक जनतेच्या हितानुसार आवश्यक सुधारणा करण्यात याव्यात, अशी स्पष्ट व ठोस मागणी निचपूर येथील भाजपाचे जि.प.साठीचे संभाव्य उमेदवार महेश्वर रघुनाथ मुंडे यांनी तहसील कार्यालय तसेच विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे हरकत निवेदनाद्वारे केली आहे.
दि. १४ जुलै २०२५ रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप प्रभाग रचना मसुद्यावर हरकत दाखल करताना त्यांनी या रचनेतील भौगोलिक, सामाजिक व प्रशासकीय विसंगती स्पष्ट केल्या आहेत. चुकीच्या प्रभाग विभाजनामुळे स्थानिक लोकांच्या शासकीय सोयीसुविधा आणि विकासकामांवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता त्यांनी अधोरेखित केली आहे.
महत्वाच्या मागण्या पुढीलप्रमाणे:
१. राजगड तांडा – सद्यःस्थितीत गोकुंदा प्रभागात समाविष्ट असलेला राजगड तांडा सामाजिक व भौगोलिक दृष्टिकोनातून सारखणी प्रभागाशी अधिक जोडलेला आहे. त्यामुळे तो सारखणी जिल्हा परिषद प्रभागात समाविष्ट करावा.
२. मारेगाव (खालचे)– सध्या सारखणी प्रभागात समाविष्ट केलेले हे गाव वाहतूक व व्यवहाराच्या दृष्टिकोनातून गोकुंदा प्रभागाशी निगडीत आहे. त्यामुळे गोकुंदा प्रभागात याचा समावेश करावा.
३. गटाचे नाव बदलाची मागणी – निचपूर गाव हे भौगोलिकदृष्ट्या मध्यवर्ती व सर्व सुविधांसह प्रशासकीय दृष्टीने योग्य असून, प्रभागाचा केंद्रबिंदू ठरतो. त्यामुळे जिल्हा परिषद गटाला सारखणी ऐवजी 'निचपूर' नाव द्यावे.
४. प्रशासकीय सलगतेवर भर – सारखणी आणि दहेली हे गण केवळ पाच किलोमीटर अंतरावर असून एकाच रस्त्यावर असल्यामुळे संपर्क सुलभतेसाठी त्यांचे प्रभाग एकाच गटात येणे योग्य ठरेल.
विधी व जनहिताचा आधार
मुंडे यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद अधिनियम १९६१ च्या कलम १२ चा आधार घेत सुधारित प्रभाग रचना करण्याची मागणी केली आहे. या अंतर्गत प्रभागनिर्मिती करताना भौगोलिक सलगता, सामाजिक-सांस्कृतिक एकत्रता, वाहतूक व्यवस्था आणि प्रशासकीय सुसूत्रता यांचा विचार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे.
निष्कर्ष: प्रस्तावित मसुद्यातील त्रुटी दूर करून वरील सुधारणा तातडीने अमलात आणाव्यात, हीच अपेक्षा असल्याचे नमूद करत “शासनाने जनभावना व वस्तुनिष्ठ तत्त्वांचा आदर करावा”, अशी नम्र मागणी महेश्वर मुंडे यांनी आपल्या निवेदनात व्यक्त केली आहे.
Social Plugin