Ticker

6/recent/ticker-posts

तामसा शहर गुन्हेगारीच्या गर्तेत! – पोलीस ठाणे १०० मीटरवर जुगाराचा अड्डा, ठाणे इन्चार्जवर गंभीर आरोप



,प्रतिनिधी - उत्तम पाईकराव)

नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील तामसा शहर आज गुन्हेगारी, अवैध धंदे आणि पोलिसी संरक्षणामुळे गढूळ झाले आहे. गुटखा, मटका, पत्त्यांचा जुगार, गावठी व अवैध विदेशी दारू, गांजा, अमली पदार्थ, अवैध रेती उपसा आणि चोरी-दरोड्यांच्या घटनांनी संपूर्ण परिसर घातक बनलेला आहे. तामसा पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट इतका वाढला आहे की, स्थानिक नागरिकांमध्ये ठाणेदार आणि गुन्हेगार यांच्यातील संधानावर खुलेपणाने चर्चा सुरू आहे.

 *ठाणे इन्चार्ज आल्यापासूनच गुन्हेगारीला उधाण?* 

स्थानिकांचा ठाम आरोप आहे की, तामसा पोलीस ठाण्याचे विद्यमान ठाणेदार खेडकर हेच या सगळ्या गोंधळाचे मूळ आहेत. त्यांच्या पदग्रहणानंतर शहरात मटका, पत्ते, गुटखा विक्री, दारूची अवैध वाहतूक, गांजाची विक्री आणि अमली पदार्थ खुलेआम विकले जात आहेत. अगदी लहान मुलं शाळा सोडून नशेच्या गर्तेत जात असून त्यांचं आयुष्य उध्वस्त होत आहे. गुंडांचे टोळके खुलेआम फिरत आहेत, आणि सामान्य नागरिक भयाच्या छायेत जीवन जगत आहेत.

 *पंचमीच्या दिवशी ठाण्यापासून 100 मीटरवर जुगार अड्डा!* 

हेच नाही तर पंचमीच्या दिवशी, पोलीस ठाण्यापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर मोठ्या प्रमाणावर पत्त्यांचा जुगार सुरू असल्याचे उघड झाले. नांदेड परिक्षेत्रातील पोलीस उपमहा निरीक्षकांनी तयार केलेल्या पथकाने या अड्ड्यावर छापा टाकला आणि शेकडो जुगारींना रंगेहाथ पकडले. कितीतरी लाखो रुपयांची रोख रक्कम आणि जुगारासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू जप्त करण्यात आल्या. 

पण आश्चर्य म्हणजे, नंतर राजकीय दबावाखाली केवळ बारा गरीब व्यक्तींवर कारवाई करण्यात आली, 38 हजार 740 रक्कम जप्ती दाखवली आणि आर्थिक देवाण-घेवाण सेटलमेंट करून, उर्वरित शेकडो जुगारी मोकळे सोडले गेले.

 *पथक केवळ पैसे उकळण्यासाठीच?* 

या घटनेनंतर स्थानिकांमध्ये प्रचंड संताप आहे. "हे पथक केवळ पैशासाठीच आले होते का?" असा थेट सवाल लोकांनी केला आहे. शेकडो लोक, लाखो रुपयांच्या बॅगा घेऊन सोडून देणे आणि गरीबांना लक्ष्य करणे

 – यामागे कोणाचा आशीर्वाद होता, हे उघड करण्याची मागणी होत आहे. तामसा पोलीस स्टेशन परिसरात पोस्को अंतर्गत वाढते गुन्हेही पोलिसांच्या निष्क्रियतेचे फलित मानले जात आहेत.

 *गुन्हेगार मोकाट, जनता त्रस्त!* 

तामसा परिसरातील हॉटेल, ढाबे, दुकाने यातून मोठ्या प्रमाणात दारू विक्री सुरू आहे. गांजाचीही मागणीप्रमाणे उपलब्धता असून अनेक तरुण व्यसनाधीन झाले आहेत. चोरी, मारहाण, दारू पिऊन भांडणे आणि महिला व मुलींवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. काही महिन्यांतच या भागात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळल्याची भावना जनमानसात निर्माण झाली आहे.

 *ठाणे इन्चार्जवर त्वरित कारवाई करा!* 

या पार्श्वभूमीवर ठाणेदार खेडकर यांची त्वरित बदली करून त्यांच्या कार्यकाळाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. "तामसा शहराचे सामाजिक आरोग्य आणि सुरक्षितता वाचवायची असेल तर या भ्रष्ट अधिकाऱ्याला त्वरित हटवा," अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. अनेक सामाजिक संघटना, युवक आणि महिला आता आंदोलनाच्या तयारीत आहेत.


 *नांदेड जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे तातडीची मागणी* 

नांदेड जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी तामसा पोलीस स्टेशन हद्दीतील वाढत्या गुन्हेगारीवर तात्काळ कारवाई करावी. ठाणेदार खेडकर यांच्या कार्यपद्धतीची सखोल चौकशी करून जरुरी असल्यास निलंबनाची कारवाई करावी. जर वेळेवर कारवाई झाली नाही, तर जनतेचा संताप रस्त्यावर येईल, आणि त्याची जबाबदारी संपूर्णपणे जिल्हा प्रशासनावर राहील.