(अमोल शितळे @नांदेड प्रतिनिधी )
नांदेड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कंधार तालुक्यातील एका खासगी शिक्षण संस्थेत कार्यरत असलेले शिक्षक आशिष भाऊसाहेब शिंदे यांचा मृतदेह अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव परिसरातील स्वराज्य फॅमिली रेस्टॉरंट अॅण्ड लॉजमधील खोलीत शनिवारी (2 ऑगस्ट) सकाळी आढळून आला.
हॉटेल कर्मचाऱ्यांनी रूम सर्व्हिससाठी दरवाजा अनेक वेळा ठोठावला, परंतु कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने व्यवस्थापकांनी संशय व्यक्त करत दरवाजा उघडण्याचा निर्णय घेतला. दरवाजा उघडताच खोलीत आशिष शिंदे हे पंख्याला दोरीच्या साहाय्याने लटकलेल्या अवस्थेत आढळले.
घटनेची माहिती मिळताच अर्धापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे नांदेडच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
या प्रकरणात अर्धापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, मृत्यूमागील नेमकं कारण काय, याचा तपास सुरू आहे. शिक्षकांच्या मृत्यूने परिसरात खळबळ उडाली आहे.
Social Plugin