Ticker

6/recent/ticker-posts

दिग्रस तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले; धावंडा नदीला पूर, पिकांचे प्रचंड नुकसान




प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा खरा ठरला; अनेक गावांचा संपर्क तुटला, तातडीने पंचनामे करून मदत देण्याची मागणी

 राजपाल बनसोड प्रतिनिधी दिग्रस 

दिग्रस : प्रशासनाने दिलेल्या सतर्कतेच्या इशाऱ्यानंतर, दिग्रस शहरासह ग्रामीण भागाला गुरुवारी (दि. २८) दुपारी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे धावंडा नदीसह अनेक नाल्यांना पूर आल्याने वाहतूक ठप्प झाली होती, तर शेतात पाणी शिरल्याने उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून मदत जाहीर करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

गुरुवारी दुपारी अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील सर्व नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागले, ज्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. धावंडा नदीला पूर आल्याने वाहतूक बराच काळ खोळंबली होती. पुराचे पाणी शेतात शिरल्याने, मोठ्या कष्टाने वाढवलेल्या पिकांवर अक्षरशः पाणी फिरले. अनेक गावांमध्ये घरात पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्याचीही मोठी नासाडी झाली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, चिरकुटा धरणाचे पाच दरवाजे उघडून अरुणावती नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

यवतमाळ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा संदेश प्रशासनाने अनेक नागरिकांना मोबाईलवर पाठवून सतर्कतेचा इशारा दिला होता, जो खरा ठरला. आता या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून, शासनाने भरीव मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी आणि नागरिक करत आहेत. या नैसर्गिक आपत्तीमुळे आधीच संकटात असलेला बळीराजा आणखी अडचणीत सापडला आहे.