- अनुभव व दृष्टी' या विषयांवर आयोजित परिसंवाद कार्यक्रमात सहभागी झालो. मुक्तिसंग्राम, सीमाप्रश्न, कामगार चळवळ आणि साखर उद्योग अशा सर्व क्षेत्रांतील आठवणींना उजाळा दिला व भविष्यातील आव्हानांबद्दल उपस्थितांना संबोधित केलं. आजचा हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या आणि विशेषतः साखर धंदातल्या एका मार्गदर्शकाचा स्मरण करण्याचा हा सोहळा आहे. साथी किशोर पवार समाजवादी चळवळीचे एक ज्येष्ठ नेते. एस एम जोशी असोत, नानासाहेब गोरे असोत, बॅरिस्टर नाथ पै असोत या सगळ्यांच्या विचाराने त्यांना अखंड साथ देण्याची भूमिका ज्या काही महत्त्वाच्या लोकांनी महाराष्ट्रात घेतली त्याच्यामध्ये किशोर पवारांचा उल्लेख हा प्रकर्षाने करावा लागेल. उभं आयुष्य त्यांनी कामगार चळवळीमध्ये आणि पुरोगामी विचाराच्या जपणुकीसाठी घालवलं. आम्हाला लोकांचे त्यांचे संबंध नंतरच्या काळातले होते. अनेक चळवळी त्यांनी केल्या अनेक प्रश्न हातामध्ये घेतले. ते प्रश्न हातामध्ये घेत असताना आमच्या पिढीने कुठे ना कुठे त्यांना हातभार लावण्याचं काम त्या काळामध्ये केलेलं होतं. आज ज्यांचे विचार ऐकले आपण बाळासाहेब थोरात. हे नगर जिल्ह्यातले आहेत. महाराष्ट्रातला त्या काळातला नगर जिल्हा हा एक वेगळा जिल्हा होता. हा डाव्या चळवळीचा एक महत्त्वाचा जिल्हा होता. साखर कामगारांची चळवळ कोपरगाव असेल त्याच्या आजूबाजूचा परिसर असेल या सगळ्या भागांमध्ये होता. कारखानदारी सुरुवातीचे प्रवरानगर हा देशातला पहिला सहकारी कारखाना हा जर सोडला तर त्याही पूर्वी नगर जिल्ह्यामध्ये खाजगी कारखान्याची अनेक उदाहरण होती. आणि ते राहता, कोपरगाव, श्रीरामपूर मध्ये होते. या खाजगी कारखान्यातला एखाद-दुसरा सोडला तर सबंध त्याची मालकी ही मुंबईतील धनाढ्य लोकांकडे होती. त्यामुळे कामगारांच्या हिताचा प्रश्न आला प्रसंगी संघर्ष करावा लागत असे. ते करण्यासाठी जी एक नेतृत्वाची फळी नगर जिल्ह्यात उभी राहिली होती त्याच्यामध्ये साथी किशोर पवारांचा उल्लेख हा प्रकर्षाने करावा लागेल. ज्यांचं काम त्या काळात बघण्याची संधी मला स्वतःला सुद्धा मिळाली होती. ते अनेक चळवळीत होते.
मी एक गमतीची गोष्ट सांगू इच्छितो मी नववीला शिकत असताना मी प्रवरानगरच्या महात्मा गांधी विद्यालयात शिकत होतो. आता प्रवरा नगरचा आणि माझा काय संबंध तर माझे वडील बंधू आप्पासाहेब पवार हे त्या ठिकाणी नोकरी करत होते. त्या वेळेला सातवी-आठवी हे शिकत असताना अभ्यासापेक्षा इतर उद्योगात मी जास्त लक्ष घालतो म्हणून माझ्या आई-वडिलांनी मला प्रवरा नगरला पाठवलं आणि प्रवरा नगरच्या शाळेमध्ये मी एक वर्ष शिकलो. त्या शाळेचे वैशिष्ट्य एकच होता कि, अनेक चळवळीमध्ये त्या शाळेतले विद्यार्थी अग्रभागी असायचे.
गोव्याची चळवळ सुरू झाली एसएम जोशी असतील, बॅरिस्टर नाथ पै असतील, किशोर पवार असतील या सगळ्यांनी त्या चळवळीत झोकून दिलं. आणि एक मोठा सत्याग्रह करण्याचा निर्णय झाला. आणि तो सत्याग्रह कुठे तर गोव्याच्या सीमेवर. हिरवे गुरुजी नावाचे जे गृहस्थ होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली एक सत्याग्रहाची तुकडी होती. पोर्तुगीजांचं राज्य होतं आणि सत्याग्रह केल्यानंतर ह्या तुकडीवर पोर्तुगीजांनी गोळीबार केला आणि त्यामध्ये हिरवे गुरुजी मृत्युमुखी पडले. ही बातमी जशी आली तसं महाराष्ट्रात अनेक ठिकाणी चळवळी उभ्या राहिल्या. हे सांगायचं कारण म्हणजे माझ्या आयुष्यातील पहिला मोर्चा मी प्रवरा नगरला काढला. आमची शाळा बंद केली आणि शाळा बंद करून पोर्तुगीजांचा निषेध करण्याचा मोर्चा मी काढला. माझ्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात ही प्रवरानगरमधून झाली. आम्ही मोर्चा काढला. कारखान्यावर गेलो. कारखान्याच्या लोकांना सांगितलं कारखाना बंद करा. गोव्याचा सत्याग्रह सुरू आहे. लोकांनी हौतात्म्य पत्करलं. म्हणून आपल्याला हे सगळं बंद करायचं. कारखान्यांच्या संस्थापकांमध्ये अनेक लोक होते अण्णासाहेब शिंदे होते, पद्मसिंह विखे पाटील होते असे अनेक लोक होते ज्यांनी हा कारखाना उभा केला आणि आम्ही मोर्चा त्यावेळेला काढला आणि कारखाना बंद करा हे सांगायला आलो त्या वेळेला पद्मसिंह विखे पाटील हे आमच्या समोर आले. त्यांनी आम्हाला लोकांना विचारलं, "पोरांनो काय तुमचं म्हणणं आहे?" मी सांगितलं "कारखाना बंद करा. पोर्तुगीजांचा निषेध करायचा हिरवे गुरुजींची हत्या झालेली आहे." त्यांनी विचारलं, "जर तुम्ही कारखाना बंद केला तर तुमच्या गोव्याचा प्रश्न कसा सुटेल?" आमच्याकडे काही उत्तर नव्हतं आम्ही सांगितलं, "आम्हाला माहित नाही. कारखाना बंद करा." ते म्हणाले, "मी कारखाना कायमचा बंद करतो गोवा घेऊन दाखवा." आमच्याकडे काही उत्तर नव्हतं. पण माझ्या मनात ही राहिलेली गोष्ट गमतीशीर आहे. त्या काळामध्ये या सबंध गोव्याच्या चळवळीचे नेतृत्व करायचं काम किशोर आणि त्यांचे बाकीचे सहकारी करत होते. महाराष्ट्र मध्ये एक वेगळं वातावरण त्या काळामध्ये झालं अनेक गोष्टी त्यांच्या सांगता येतील.
'महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न' ज्याचा आत्ताच ठाकूर यांनी उल्लेख केला होता आणि त्या सीमा प्रश्नासाठी एकीकडे समितीची स्थापना झाली. त्याच्यामध्ये सरचिटणीस पदाची विशेष जबाबदारी किशोर पवारांकडे होती. एस एम जोशी अध्यक्ष होते. बैठक झाली आणि बैठकीत ठरलं सत्याग्रह करायचा. सत्याग्रह करायचं ठरल्यानंतर बाळासाहेब ठाकरे होते आणखी अनेक लोक होते. त्या बैठकीमध्ये निर्णय हा झाला सत्याग्रहाची पहिली तुकडी ही शरद पवारांच्या नेतृत्वात जाईल. त्यामुळे हा निर्णय झाला की बेळगावला जाऊन सत्याग्रह करायचा आणि सीमा भागाची मागणी करायची. ठरल्याप्रमाणे आम्ही निघालो. आमच्या कानावर काही लोकांनी घातलं होतं "कागल च्या जवळ पोहोचल्यानंतर तुमची गाडी अडवली जाईल आणि तुम्हाला अटक केला जाईल". काहीही करून तर आम्हाला जायचं होतं. निर्णय तर घेतला आहे. समितीचा निर्णय होता. सत्याग्रहाची पहिली तुकडी त्याच्यात माझं नाव आणि त्यामुळे मला गेलंच पाहिजे हा निर्णय आम्ही लोकांनी घेतला. शेवटी जायचं कसं तर शेवटी कागलच्या जवळपास वेश बदलला आणि गाडीचा ड्रायव्हर मी झालो. आधीचा ड्रायव्हर मागे बसवला आणि ती गाडी आम्ही बेळगावच्या दिशेने नेली. सीमा भागाची सुरुवात जिथून होते त्या कागलच्या पुढे गाडी थांबवली. कर्नाटकच्या पोलिसांनी विचारलं, "कौन है ?" आम्ही म्हटलं, "हम है" ते म्हणाले, "हम कौन ?" मी म्हटलं, "हं है कासीरभाई" मग ते म्हणाले, "अच्छा और कौन है?" आणि बघितलं गाडीत तर एक दोन लोक होते बाकी कोणी नव्हतंच. कारण गाडी मी चालवत होतो पाठीमागे ड्रायव्हर बसला होता. त्याने मग काही संशय घेतला नाही आणि गाडी आमची सोडली. गाडी सोडल्यानंतर बेळगाव गेलो आणि तिथे गेल्यानंतर समितीने एका स्थानिक कार्यकर्त्याच्या घरी जाण्यास सांगितलं होतं. रात्री २ वाजता त्या कार्यकर्त्याच्या घरी जाऊन आम्ही मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता सत्याग्रह करायचं जे ठिकाण होतं त्या ठिकाणी एका घराच्या भिंतीवरनं उड्या मारून पोहचलो आणि आम्ही लोकांनी तिथे सत्याग्रह केला. त्यावेळेला कर्नाटकचे पोलीस अत्यंत रागावलेले होते त्यांनी सत्याग्रहींवर लाठी हल्ला केला. आम्हाला दहा-बारा लाठ्या बसल्या आणि अटकही झाली. अटक झाल्यानंतर बेळगावच्या जवळ एक धरण आहे, हिडकल डॅम. आम्हाला पकडून तिथे नेऊन ठेवलं. एस एम जोशींना हे कळाल्यानंतर एस एम तिथे आले. ज्या धरणावर आम्हाला अटक करून ठेवलं होतं तिथे आले. त्यांना कोणी अडवलं नाही आणि आम्हा लोकांना भेटले आणि आम्हा लोकांचा विश्वास वाढवला.
मला सांगायचं कौतुक असं की माझ्या पाठीवर सात-आठ लाठ्या बसलेल्या होत्या आणि त्याचा परिणाम काय होतो हे तुम्ही सगळे चळवळीतले कार्यकर्ते आहात त्यामुळे तुम्हाला हा नीट माहिती आहे. पण एस एम जोशींनी प्रेमाने हात पाठीवर हात फिरवला आणि त्यानंतर सुटका झाल्यानंतर किशोर पवार आणि बाकीच्या सगळ्यांनी हा सत्याग्रहाचा कार्यक्रम पुढे चालू ठेवायचा हा निर्णय घेतला. त्यानंतरची दुसरी तुकडी ही निहाल अहमद आणि छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली होती. छगन भुजबळांनी गमतीच केल्या. त्यांनी गोव्याच्या भागातून जायचं ठरवलं. त्यांनी पोलीस अधिकाऱ्याचे कपडे घातले आणि त्यानंतर त्यांना जेव्हा अडवलं आणि विचारलं की, "कौन है ?" त्यांनी सांगितलं, "हम होमगार्ड है" होमगार्ड म्हटल्यानंतर त्यांची ही गाडी सोडण्यात आली. मग पुन्हा एके ठिकाणी त्यांना अडवलं ओळखलं आणि त्यांना तीन महिने तिथल्या तुरुंगामध्ये टाकलं. आमची सुटका त्यादिवशीच झाली पण भुजबळांना मात्र तिथे महिना दोन महिना राहावं लागलं. पण ह्यासगळ्यात ९ लोक तिथे हुतात्मा झाले होते. अशा वातावरणात त्या समितीचे काम सातत्याने चालू ठेवण्याचा उपक्रम किशोर पवारांनी केलेला होता. अशा अनेक गोष्टी सांगता येतील की त्यांनी चळवळीमध्ये लक्ष घातलं महाराष्ट्राच्या हिताचा प्रश्न जिथे जिथे येईल मग त्यामध्ये गोवा मुक्ती संग्राम असेल, स्वातंत्र्याचा लढा असेल, हैदराबादचा स्वातंत्र्याचा लढा असेल त्या प्रत्येक संघर्षाच्या काळात किशोर पवार हे अग्रभागी राहिलेले होते.
अलीकडच्या काळामध्ये साखर धंद्याशी माझाही संबंध आला आणि साहजिकच दुसऱ्या बाजूने किशोर पवार आणि त्यांचे सहकारी असत. आमच्या बैठका व्हायच्या. त्या बैठकांमध्ये मध्यस्थीची भूमिका माझ्याकडे असे. तेव्हापासून आजपर्यंत आणि यंदाचा सुद्धा कामगारांच्या वेतनवाढीचा निर्णय माझ्याच उपस्थितीत झाला. पण सांगायचं तात्पर्य असं की त्या चर्चांमध्ये संघर्ष व्हायचा. साखर कामगार संघटनेचे हे आज माझ्यासमोर बसलेले नेतेमंडळी ज्या वेळेला चर्चेला यायचे त्यावेळी त्यांचं रूपच वेगळं असायचं. नेहमी प्रेमाने बोलणारे पण चर्चेला आल्यानंतर कुठली गोष्ट सोडायची नाही ही भूमिका घेणार आणि त्यांना किशोर पवारांचं मार्गदर्शन असायचं. दुसऱ्या बाजूने शंकरराव कोल्हे, शंकरराव काळे असे हे साखर धंद्यातले लोक. गमतीचा भाग म्हणजे बैठकीला बसल्यानंतर कोल्हे आणि किशोर यांचा संघर्ष खूप टोकाला जायचा आणि सगळं संपल्यानंतर दोघं सख्खे भाऊ असल्यासारखे वागायचे. अशा प्रकारचे संबंध होते. म्हणून सबंध महाराष्ट्रातल्या साखर धंदातल्या कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांच्या हिताचा, महाराष्ट्राच्या हिताचा विचार किशोर पवारांनी जो घेतला तो कधी सोडला नाही.
आज भारतामध्ये महाराष्ट्राचा साखरेचा धंदा हा महत्त्वाचा आहे. एक काळ असा होता की महाराष्ट्रामध्ये कापड गिरणी हा धंदा मोठ्या प्रमाणावर होता. तुम्हाला ठाऊक असेल, मुंबईमध्ये शेकडो कापड गिरण्या होत्या. कामगारांची जबरदस्त शक्ती असलेला असा गिरणगाव नावाचा भाग होता. तुम्ही त्या काळात सकाळी जर का गिरणगावात गेलात तर हजारोंच्या संख्येने आपली भाकरी बरोबर घेऊन गिरणीमध्ये जाणारा कामगार आपल्याला बघायला मिळायचा. २०० गिरण्या मुंबईत होत्या पण आज एकच उरली आहे आणि ते सगळं गिरणगाव कामगार चळवळीचं देशाचं सेंटर होतं. अनेक लोकांची नावे घेता येतील कॉम्रेड डांगे, डॉ. दत्ता सामंत आणि त्यांच्याबरोबरचे अनेक सहकारी कामगार चळवळीत होते. ही सबंध चळवळ अतिशय महत्त्वाची होती. त्याही चळवळीमध्ये एसएम जोशींच्या विचाराने काम करणारे जे महत्त्वाचे लोक होते त्यामध्ये किशोर पवार होते. आज त्या भागात मी जातो मला अतिशय वाईट वाटतं एक गिरणी बघायला मिळत नाही. कष्टकरी कामगार बघायला मिळत नाही. त्या ठिकाणी ४०-५० मजल्याच्या इमारती आहेत आणि त्यात माझा मराठी माणूस कुठेच नाहीये. त्याची ताकद राहिलेली नाहीये. त्या गिरणीमध्ये खस्ता खाऊन देशाची संपत्ती वाढवणारा कामगार कुठे त्या ठिकाणी दिसत नाही. म्हणून किशोर पवार आणि बाकीच्या सहकाऱ्यांनी जो आदर्श आपल्या सगळ्यांसमोर ठेवला त्याचा जर गांभीर्याने विचार करायचा झाला तर माझं प्रामाणिकपणाने सांगणं आहे की सबंध कामगार चळवळीच्या संबंधातला जे चित्र देशात आहे, जे राज्यात आहे त्याच्यामध्ये बसून आपल्याला विचार करावा लागेल.
आज कामगारांची मानसिकतासुद्धा संघर्ष नको अशी आहे. एका दृष्टीने ते चांगलं आहे पण संघर्ष नको या नावाने जर तुमची पिळवणूक होत असेल तर त्या संबंधीचा विचार आपल्याला नक्की करावा लागणार आहे. महाराष्ट्राचा साखरेचा धंदा हा आघाडीवर आहे. सहकारी साखर कारखाने आज दिवसेंदिवस कमी होत आहेत. खाजगी कारखाने वाढलेत. कारखान्याच साईज सुद्धा वाढल्या. साधारणतः सगळं सूत्र हे कमीत कमी कामगारांच्यावर कारखाना कसा चालवायचा असं आहे. कारखाना टिकला पाहिजे याबद्दल माझ्या मनात शंका नाही पण कारखान्यासाठी जो घाम गाळतो, साखर उत्पादन करतो त्या कामगाराचं काय? त्या संबंध संघटनेचं काय? याकडे दुर्लक्ष करायची भूमिका आपल्याला कोणालाही परवडणार नाही. आज ना उद्या शांतपणाने बसून या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल. आज जगामध्ये दोन नंबरचा साखरेचा धंदा भारतात आहे. साखर उद्योगात ब्राझील अग्रस्थानी असला तरी बाकीचे जगातील जे देश आहेत ते मागे पडलेत आणि त्याची जागा भारताने घेतलेली आहे.
आज उत्तर प्रदेशासारखं राज्य साखर धंद्यात एक नंबरचा राज्य आहे. तिथं कारखान्यांची साईज मोठी आहे आणि तेच लोक महाराष्ट्रात आले आणि ते महाराष्ट्रात आल्यानंतर दिवसेंदिवस सहकारी चळवळीला सुरुंग लागायला लागलेले आहेत. त्यातून सहकार दूर व्हायला लागलेला आहे. आज ज्या भागातून मी अनेक वर्ष प्रतिनिधित्व केलं सुदैवानं तिथे अजूनही माळेगाव काय, छत्रपती काय, सोमेश्वर असे सहकारी कारखाने टिकले. पण आजूबाजूला गेल्यानंतर भीमा पाटस किंवा तत्सम कारखाने पाहिल्यानंतर अस्वस्थता वाटते. एखादा प्रश्न उभा राहिल्यानंतर कुणाशी चर्चा करायची? संघटनेचे लोक येऊन सांगतात बंगलोरला कोणीतरी राहतो. महाराष्ट्राच्या बाहेर कुठेतरी राहतो आणि अशा अनेक अडचणी उद्भवतात. बरं, त्यांना स्थानिक लोकांबद्दल काहीही आस्था नाही. एकेकाळी खाजगी कारखाने होते ज्याचा उल्लेख मी काही वेळापूर्वी केला ते महाराष्ट्रातल्याच लोकांच्या हाती होते. फलटणचा कारखाना कुणाचा तर माधवराव आपटेंचा कारखाना. श्रीरामपूरची महाराष्ट्र शुगर मिल कोणाची तर डहाणूकारांची. महाराष्ट्रातील नावं तिथं दिसत होती. आज तसं चित्र दिसत नाही. आणखीन काही दिवसांनी नवीन संकट येतील.
आज बाळासाहेब थोरात आणि त्यांचे वडिलही अतिशय उत्तम कारखाना चालवतात. कधीही वेतन किंवा त्यासंबंधीचा संघर्ष नाही. कधीही कामगार आणि मॅनेजमेंट यांचा वाद नाही. पण मला त्यांची सुद्धा काळजी वाटते आणि त्याचं कारण आजूबाजूचे खासगी कारखाने. त्याचं स्वरूप बदललेला आहे. इतर ठिकाणचे कारखाने ३ हजार टनाचे होते, पाच हजारावर गेले आणि सात हजारावर आले. पण खासगी कारखाने किती तर २०-२० हजार टनाचे कारखाने आहेत आणि दुसऱ्या बाजूने कामगारांची संख्या किती तर १५०-२००-३०० इतकीच. म्हणजे कामगारांची नोकरी जाते, कारखान्याची साईज वाढते. एकीकडे २० हजार टनाचा कारखाना आणि दुसऱ्या बाजूने २५०० टनाचा सहकारी कारखाना. ह्या संघर्षात २५०० टनाचा कारखाना टिकणार नाही आणि त्याचा विपरीत परिणाम अनेक ठिकाणच्या सहकारी कारखानदारीवर होईल. उत्पादकांवर होईल आणि कष्ट करणाऱ्या साखर कामगारांवर सुद्धा होईल. या सगळ्या पार्श्वभूमीवर मला आनंद एका गोष्टीचा आहे आजच्या या सगळ्या कार्यक्रमांमध्ये 'साखर उद्योग आणि कामगार चळवळ' हा विषय आयोजकांनी घेतला ही अतिशय चांगली गोष्ट होती. यासाठीच किशोर पवार यांनी आयुष्य दिलं.
माझं म्हणणं एकच आहे की, आज ना उद्या कधीतरी एकत्र बसून चर्चा करावी लागेल. साखर संघटनेच्या लोकांना विश्वासात घ्यावं लागेल. महाराष्ट्र सरकारला विश्वासात घ्यावं लागेल आणि सुचवावं लागेल की कारखान्याची साईज काय असावी. कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांची संख्या किती ठेवायची. उत्पादकाला न्याय मिळाला पाहिजे ह्याबद्दल अजिबात कोणाच्या मनात शंका नाही. आणि खरं सांगायचं म्हणजे माझ्या पाहण्यात असं येतंय की आता या सबंध कारखानदारीमध्ये विशेषतः सहकारी कारखानदारीमध्ये चित्र बदललेलं आहे. त्या ठिकाणचा ४०% कामगार बहुतेक त्याचा कारखान्याचा सभासद असतो, तो मालकही व्हायला लागलेला आहे हे चित्र आहे आणि हे जर चित्र टिकवायचं असेल तर दोघांच्याही हिताचा विचार करावा लागेल. नुसता साखर एके साखर हा धंदा करून परवडणार नाही. आज साखर तयार करा, वीज तयार करा, इथेनॉल तयार करा.
साखर उद्योग पाहण्यासाठी मला वाटतं मी आणि बाळासाहेब थोरात ब्राझीलला गेलो होतो. गेल्याच आठवड्यात ब्राझीलमधील नरेंद्र मुरकुंबी नावाचे साखर कारखानदार मला भेटले. ते मराठी आहेत, आपल्या बेळगावचे. ब्राझीलमध्ये त्यांचा एक कारखाना आहे त्यांना विचारलं, "कसा चाललाय कारखाना?" ते म्हणाले ,"चांगला चाललाय" पुढे विचारलं, "किती टनाचा आहे?" ते म्हणाले, "दररोज ३५ हजार टन". त्यानंतर विचारलं, "ऊस उत्पादक किती?" तर ऊस उत्पादक फक्त १६. म्हणजे १५-१६-२० याच्यापेक्षा जास्त ऊस उत्पादक ब्राझीलमध्ये नाहीत म्हणजे जगात चित्र बदलतंय आणि याची नोंद आपण घेऊन, सरकारला काही धोरण आखायला लावून, सहकारी चळवळीत काम करणाऱ्या नेत्यांना विश्वासात घेऊन, साखर धंद्यातील कष्टकरी कामगारांचे तुम्हा लोकांच्या संघटनांना विश्वासात घेऊन आपल्याला पुढची पावलं ही टाकावी लागतील. सध्याचे दिवस साधे नाहीत, संघर्षाचे, कष्टाचे आहेत पण एक गोष्ट चांगली आहे की अजूनही या सबंध कारखानदारीमध्ये संघर्ष असेल तिथे संघर्ष करतात पण कितपत ताणायचं याचं तारतम्य कामगार संघटना पाळतात. त्यामुळे ही कारखानदारी टिकलेली आहे आणि ती टिकवण्याचं काम आपल्याला करायचा आहे. ते काम आपण प्रामाणिकपणे केलं तर ही खऱ्या अर्थाने किशोर पवारांना श्रद्धांजली होईल. या सगळ्या कामांमध्ये आम्ही लोक अंत:करणापासून तुमच्याबरोबर आहोत एवढेच सांगतो. आज या निमित्ताने इथे येता आलं किशोर पवारांची आठवण आली आणि त्यांच्या कर्तृत्वाच्या अनेक गोष्टींची यादी देता येईल अशा गोष्टी नजरेसमोर आल्या आणि ती संधी तुम्ही लोकांनी दिली त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि थांबतो.





Social Plugin