Ticker

6/recent/ticker-posts

खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान



– निळकंठ वसू, प्रतिनिधी, आलेवाडी

दोन दिवसांपूर्वी आलेवाडी गावाच्या शेतशिवारात ढगफुटी सदृश झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी वर्गावर मोठे संकट ओढावले आहे. या अनपेक्षित पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोयाबीन, कपाशी तूर, पिके यामध्ये विशेषतः मोठा फटका बसल्याचे दिसून येत आहे.

परिस्थितीची गंभीर दखल घेत तहसीलदार यांनी आलेवाडी गावास भेट दिली. त्यांनी महसूल विभागाच्या मंडळ अधिकारी व तलाठ्यांना तातडीने शिवाराची पाहणी करून नुकसानीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. महसूल कर्मचारी सध्या शेतामध्ये प्रत्यक्ष पंचनामे करत असून, अहवाल लवकरच सादर केला जाणार आहे.

शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष श्री. लक्ष्मीकांत कौठकर यांनी यासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त करत म्हटले की, "शेतकऱ्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. तात्काळ मदत जाहीर न झाल्यास आम्ही तीव्र आंदोलन छेडू. शासनाने शब्दाचे पालन करून त्वरित मदतीची घोषणा करावी."गावातील शेतकऱ्यांमध्ये देखील संतापाचे वातावरण असून, त्यांनी लवकरात लवकर मदत न मिळाल्यास रास्ता रोको आणि तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.या संकटसमयी शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीची मदत मिळावी, अशी मागणी सर्वत्र केली जात आहे.