बाळासाहेब पवार प्रतिनिधी
उमरखेड दिनांक 01/09/2025
गणेशोत्सव व गौरी उत्सव हा आनंद, उत्साह आणि भाविकतेचा सण. या काळात उमरखेड शहरासह ग्रामीण भागात अखंड वीजपुरवठा राहावा यासाठी शिवसेना शिंदे गटाने उपविभागीय अभियंता, महावितरण कंपनी, उमरखेड यांना स्पष्ट निवेदन दिले होते. परंतु, दुर्दैवाने त्या निवेदनाचा काहीही परिणाम महावितरणवर झालेला दिसत नाही.
दररोज वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा यामुळे सणासुदीच्या वातावरणात जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. भाविकांच्या घरातील आरास, सजावट, पूजन यावेळी होणारा अंधार, वारंवार बंद पडणारी उपकरणे याकडे महावितरणने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे, असे जनतेत नाराजीचे वातावरण आहे.
महावितरण कंपनीला जेव्हा वीजबिल वसुलीची वेळ येते, तेव्हा ते अत्यंत काटेकोरपणे ग्राहकांकडून पैसे उकळतात. मग त्याच काटेकोरपणाने जनतेला अखंड, दर्जेदार वीजपुरवठा का मिळू नये? ग्राहकांना केवळ बिले भरण्यासाठीच पाहिले जाते, पण वीजपुरवठ्याच्या जबाबदारीत मात्र ढिलाई केली जाते, ही परिस्थिती अत्यंत लज्जास्पद आहे.
महावितरण कंपनीने तातडीने उमरखेड तालुका व शहरात नियमित आणि अखंड वीजपुरवठा करावा. अन्यथा महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोग (MERC) ने "स्टँडर्ड ऑफ परफॉर्मन्स (SOP)" नुसार वीज ग्राहकांना मागील अनेक काळापासून खंडित विजेमुळे झालेल्या त्रासाची व नुकसानीची चौकशी करून भरपाई द्यावी अशी वीज ग्राहकांची मागणी आहे.





Social Plugin