राजपाल बनसोड प्रतिनिधी दिग्रस
दिग्रस : शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालय उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात यावे, या मागणीसाठी शनिवारी युवकांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले.
दिग्रस तालुक्यात ८४ गावे आहेत. या गावांमध्ये शासनाचे प्रतिनिधी म्हणून विविध कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. ज्या गावांमध्ये हे कर्मचारी नियुक्त आहे तेथे त्यांना मुख्यालय राहण्याचे आदेश आहे. असे असताना देखील गावांमध्ये कोणताही कर्मचारी मुख्यालय राहत नाही. तालुक्याच्या ठिकाणांवरून हे कर्मचारी संपूर्ण कामकाज करतात. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. दोन दोन तीन दिवस हे अधिकारी कर्मचारी गावात फिरकत नसल्याने गावकऱ्यांची कामे रेंगाळत आहे. यामुळे तालुक्यातील साखरा व मोख येथील युवकांनी मागील आठवड्यात तालुका प्रशासनाला लेखी निवेदन दिले होते. मात्र, त्यानंतरही तलाठी, ग्रामसेवक शिक्षक, कृषी सहाय्यक, आरोग्य कर्मचारी यांच्यात कुठलाही बदल झालेला नाही. त्यामुळे शनिवारी तालुक्यातील साखरा व मोख येथील विशाल चव्हाण, मांगीलाल चव्हाण, अंकुश राठोड, प्रशांत चव्हाण, योगेश राठोड या युवकांनी दिग्रस शहरातील नगरपालिकेच्या पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन सूरू केले. दरम्यान काही वेळाने तालुका प्रशासनाने या बाबीची गंभीर दखल घेतली. तसेच युवकांना आश्वासन दिल्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले.





Social Plugin