Ticker

6/recent/ticker-posts

ग्राम रोजगार सहाय्यकांचे कामबंद आंदोलन सुरू



मालेगाव प्रतिनिधी):-जावेद धन्नू भवानीवाले

   महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कार्यरत ग्राम रोजगार सहाय्यकांनी शासन निर्णय दि. ०३ ऑक्टोबर २०२४ नुसार मिळणारे मानधन गेल्या अनेक महिन्यांपासून थकीत असल्यामुळे अखेर कामबंद आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे.

   ग्राम रोजगार सहाय्यक संघटना शाखा मालेगाव यांच्या वतीने गटविकास अधिकारी, पंचायत समिती मालेगाव यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनावर तालुक्यातील सर्व ग्राम रोजगार सहाय्यकांच्या स्वाक्षऱ्या असून, शासनाने तातडीने थकीत मानधन दिले नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे.

    शासन निर्णयानुसार, ०३ ऑक्टोबर २०२४ पासून ग्राम रोजगार सहाय्यकांचे मानधन थेट बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार होते. मात्र, प्रत्यक्ष अंमलबजावणीत झालेल्या विलंबामुळे रोजगार सहाय्यकांना मानधन मिळालेले नाही.            

    तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मानधनाबाबत आश्वासन दिले होते, परंतु ते प्रत्यक्षात मिळाले नसल्याने रोजगार सहाय्यकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

    कामबंद आंदोलनामुळे ग्रामपंचायत स्तरावरील विकासकामे ठप्प होण्याची शक्यता व्यक्त होत असून, शासनाने तातडीने निर्णय घेऊन मानधन वितरित करावे, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे.

   दि. ०१ सप्टेंबर २०२५ पासून संपूर्ण महाराष्ट्रात ग्राम रोजगार सहाय्यकांनी कामबंद आंदोलन सुरू केले असून, मालेगाव तालुक्यातील सर्व ग्राम रोजगार सहाय्यकांनी यात सक्रिय सहभाग घेतला आहे. शासनाने तातडीने लक्ष न दिल्यास हे आंदोलन आणखी तीव्र होणार असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.