महावितरणच्या मनमानी कारभारावर चौकशीसाठी समिती स्थापन
अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ
अंबड महावितरण कार्यालयातील मनमानी कारभाराविरोधात अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हाध्यक्ष व ग्राहक संरक्षण परिषद जालना चे अशासकीय सदस्य डॉ.रमेश गणपतराव तारगे यांनी तक्रार दाखल केली होती.तसेच दि.१७ सप्टेंबर २०२५ रोजी अधिक्षक अभियंता महावितरण कार्यालय,जालना येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता.
तक्रारीनुसार अंबड महावितरण विभागात विज कनेक्शनसाठी आर्थिक व्यवहार,चुकीची व अतिरिक्त बिले, ग्राहकांना बिल दुरुस्ती साठी वेठीस धरणे,तसेच सौर व रोहित्र प्रकरणांमध्ये अनियमितता झाल्याचे गंभीर आरोप आहेत.
या तक्रारीची दखल घेत महावितरण मंडळ कार्यालय जालना यांनी चौकशी समिती गठीत केली आहे.समितीत उपव्यवस्थापक (मासं) योगेश शनफड जाधव अध्यक्ष, उपव्यवस्थापक (लेखा) रामनाथ एकनाथ सदस्य व उपव्यवस्थापक (वियले) विशाल राजेंद्रकुमार कासलीवाल सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत.समितीला सात दिवसांच्या आत सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
महावितरणकडून डॉ.रमेश तारगे यांना कळविण्यात आले आहे की,तक्रारीची चौकशी सुरू असून बदलीसाठीचा प्रस्ताव छत्रपती संभाजीनगर परिमंडळ कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.तसेच चौकशीदरम्यान उपलब्ध पुरावे समितीसमोर सादर करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
त्यामुळे महावितरणने विनंती केली आहे की,दि.१७ सप्टेंबर रोजीचे आमरण उपोषण स्थगित करून प्रशासनास सहकार्य करावे.





Social Plugin