Ticker

6/recent/ticker-posts

संघर्षशील पत्रकार शेख असलम यांना “प्रेरणादीप उत्कृष्ट राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार–२०२५” जाहीर



*देगलूर/प्रतिनिधी*


        पत्रकारिता आणि समाजसेवा या दोन्ही क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या देगलूर शहरातील संघर्षशील पत्रकार शेख असलम यांना यंदाचा प्रेरणादीप उत्कृष्ट राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार–२०२५ जाहीर झाला आहे. हा सन्मान मातोश्री लक्ष्मीबाई ठाकूर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, नांदेड आणि मायडी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणार आहे.


“ते झगमगत नाहीत... पण प्रकाश देतात!” या विचारांना साजेसे कार्य करणाऱ्या शेख असलम यांच्या कामगिरीची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शंकरसिंह ठाकूर व मारोती शिकारे यांनी पुरस्काराचे निवडपत्र शेख असलम यांना प्रत्यक्ष भेटून प्रदान केले.

        गोरगरीब परिस्थितीतून जिद्द, आत्मविश्वास आणि संघर्षाच्या जोरावर पत्रकारितेत आपलं वेगळं स्थान निर्माण करणारे शेख असलम हे देगलूर तालुक्यातील प्रामाणिक व निर्भीड पत्रकार म्हणून ओळखले जातात. दैनिक साहित्य सम्राट, कुलस्वामिनी संदेश, दैनिक भास्कर, तरुण भारत अशा प्रतिष्ठित वृत्तपत्रांत त्यांनी आपल्या लेखनकौशल्याचा ठसा उमटवला. सध्या ते साप्ताहिक देगलूर टाइम्स चे कार्यकारी संपादक असून, लोकवाणी न्यूज हे यूट्यूब चॅनल यशस्वीरित्या चालवत आहेत.

       पत्रकार संरक्षण समितीच्या देगलूर तालुका अध्यक्षपदी निवड होऊन त्यांनी नेतृत्वगुण सिद्ध केले आहेत. सामाजिक क्षेत्रातही त्यांनी रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, कोरोना काळातील सेवाकार्य, अन्नदान, रुग्णालयातील मदत, पत्रकार व पोलिसांचा सन्मान अशा अनेक उपक्रमांतून लक्षणीय कामगिरी बजावली आहे.

      अशा या संघर्षशील व यशस्वी पत्रकार व्यक्तिमत्त्वाला प्रेरणादीप उत्कृष्ट राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या पुरस्कार वितरणाचा भव्य समारंभ २८ सप्टेंबर २०२५ रोजी, हॉटेल ताज पाटील, नांदेड येथे संपन्न होणार आहे...