Ticker

6/recent/ticker-posts

गावात एकोपा असेल तर विकास सहज साध्य : यशेंद्र क्षीरसागर



बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे ] 

गावात एकोपा असेल आणि कष्ट करण्याची भावना असेल तर गावाचा सर्वांगीण विकास सहज साध्य होतो. त्यासाठी शासन, प्रशासन आणि समाज यांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन खटाव पंचायत समितीच्या अंगणवाडी विभागाचे सांख्यिकी विस्तार अधिकारी यशेंद्र क्षीरसागर यांनी केले. विसापूर येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या शुभारंभप्रसंगी समन्वय अधिकारी म्हणून ते बोलत होते.

यावेळी ग्रामपंचायत अधिकारी मल्हारी सरक, उपसरपंच राजकुमार ढोले, माजी उपसभापती संतोष साळुंखे तसेच अंगणवाडी सेविका, आशा सेविका शिक्षक, मुख्याध्यापक, आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी, ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. यावेळी स्वस्थ नारी स्वस्थ परिवार तसेच पोषण महिन्याचे उद्घाटन करण्यात आले. १७ सप्टें बर ते ३१ डिसेंबर अखेर हे अभियान राबविले जाणार आहे. तर पोषण महिना हा १७ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर या दरम्यान राबविला जाणार आहे.

यावेळी सर्व ग्रामस्थ, अधिकारी, कर्मचारी यांना ऑनलाईन प्रणाली द्वारे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमाचे प्रक्षेपण दाखविण्यात आले. क्षीरसागर म्हणाले, गावाचा विकास कोणा एकाच्या हातात नसतो. शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र पशुवैद्यकीय दवाखाना अशा सर्व शासकीय संस्थांचे सक्षमीकरण करणे गरजेचे आहे. गावातील प्रत्येक घटक महत्त्वाचा आहे. मुख्यमंत्री समृद्ध


पंचायतराज अभियानामध्ये गावाचा विकास होईल अशा सर्व घटकांचा समावेश आहे. जलसमृद्ध, हरित गाव तसेच संस्थांचे बळकटीकरण करीत असताना गावकरी आणि सर्व संस्था यांनी एकोप्याने एक दिलाने काम करावे असे केल्यास गावाचा सर्वांगीण विकास अशक्य नाही. राष्ट संत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा अशा महान विभूतींचा आपल्याला वारसा आहे. भेदाभेद भ्रम अमंगळ असा संदेश संत तुकाराम महाराजांनी दिला आहे, हे लक्षात घेऊन मतभेदांच्या पलीकडे जाऊन अभियान यशस्वी करावे. तरुणांचा सहभाग वाढवावा. सर्वांनी अंगणवाडी विभागास सहकार्य करावे.