Ticker

6/recent/ticker-posts

ग्राम रोजगार सहाय्यकांचे थकीत मानधन देण्यात यावे निवेदनाद्वारे मागणी.



मन्सूर शहा धोत्रा भनगॊजी प्रतिनिधी चिखली :--

 प्राप्त माहिती नुसार, 3 ऑक्टोबर 2024 रोजीच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करणे तसेच सप्टेंबर 2024 ते आजपर्यंत ग्रामरोजगार सहाय्यकांचे थकीत मानधन वितरण करण्यात यावे, अशी मागणी ग्रामरोजगार सहाय्यक यांनी 12 सप्टेंबर रोजी उपजिल्हाधिकारी (रोहयो विभाग) जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा यांना दिले.

        दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, ग्राम रोजगार सहाय्यकाना दरमहा आठ हजार रुपये मानधन देण्याचा शासन निर्णय निघून आज १० महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. तरी सुध्दा जिल्ह्यातील ग्राम रोजगार सहायकांना मानधनाची रक्कम तर सोडाच उलट मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै व ऑगस्ट २०२५ या सहा महिन्याच्या कामाचे टक्केवारी नुसार देण्यात येणारी रक्कम मिळाली नाही. परिणामी जिल्ह्यातील ग्राम रोजगार सहाय्यकांवर उपासमारीची संकट आले आहे. सरकार जवळ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसह अन्य कामांसाठी पैसा आहे, परंतु रोजगार सहायकांना देण्यासाठी पैसा का नाही? असा प्रश्न ग्राम रोजगार सहायकांकडून उपस्थित केला जात आहे.

      घरकुल, फळबाग लागवड, कुरण लागवड आदी कामावरील मजुरांची प्रत्यक्ष जाऊन हजेरी घेणे, त्यांची उपस्थिती नोंदवून हे हजेरी पत्रक सात दिवसांनी संबंधित पंचायत समिती मधील रोजगार हमी योजनेच्या विभागाकडे जमा करणे आदी कामे करावी लागतात. त्यांनी केलेल्या मनुष्य दिवसनिर्मितच्या आधारावर त्यांना मानधन मिळते, ते मानधन अत्यल्प असते असे असताना सुद्धा ग्रामरोजगार सेवक हे काम करीत आहे, असे निवेदनात नमूद आहे.

         निवेदन देतांना बुलढाणा जिल्हा अध्यक्ष मदन खरात,  जिल्हासचिव गजानन निळे, कोषाध्यक्ष पृथ्वीराज गवई, दीपक गवई, सुरेद्र कहाळे,  तालुकाध्यक्ष दिनकरराव मोरे, सुधाकर सुर्वे, दगडू यादव, यांच्यासह बुलढाणा जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते, अशी माहिती प्रसिद्ध प्रमुख राहुल गायकवाड यांनी दिली.