Ticker

6/recent/ticker-posts

पुसेगाव येथे आज श्री सेवागिरी महाराज प्रकट दिन सोहळ्याचे आयोजन



 बुध , दि. [प्रकाश राजेघाटगे] 


 सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध देवस्थान तीर्थक्षेत्र पुसेगाव येथील भक्तजनांचे श्रद्धास्थान प. पू. श्री. सेवागिरी महाराज यांच्या तत्कालीन पुसेवाडी येथे आलेल्या १२१ व्या आगमन दिनाचे औचित्य साधत श्री. सेवागिरी महाराज देवस्थानच्यावतीने शनिवार, दि. १८ रोजी, धनत्रयोदशी दिवशी विविध धार्मिक कार्यक्रमांसह प. पू. श्री. सेवागिरी महाराज यांचा प्रकट दिन सोहळा होत आहे.

गुजरात येथील जुनागड येथून गुरू पूर्णगिरी यांच्याकडून दीक्षा घेऊन निघालेले शिवसिंग यांनी साष्टांग योगसाधना, आसने, प्राणायाम, ध्यानधारणा, समाधी इ. वर प्रभुत्व मिळवून चारधाम, सप्तपुरी, बद्रीनाथ, केदारनाथ अशी द्वादश ज्योतिर्लिंगे व देशाच्या निरनिराळ्या भागातील तीर्थक्षेत्रांच्या दर्शनाचा लाभ घेत पुन्हा गिरनार पर्वतावर श्री सेवागिरी महाराज म्हणून आल्यावर त्यांच्या गुरूंनी त्यांना दंडकारण्यात वेदावती तीरी जिथे सिद्धेश्वराचे स्वयंभू शिवलिंग आहे, तीच तुझी कर्मभूमी आहे. तिथे जाऊन लोककल्याणार्थ नावाप्रमाणे सेवा करण्याचे कार्य कर' असा आदेश दिल्यावर श्री महाराजांच्या भक्त जनांपैकी पुसेवाडीचे श्रीरंग काका व ज्योतिराव जाधव, बोंबाळ्याचे निंबाळकर व वर्धनगडचे काशीराम मोरे यांच्यासोबत श्री महाराज त्या काळाची पुसेवाडी आजची सुवर्णनगरी पुसेगाव येथे आले. तो दिवस होता, धनत्रयोदशी, साल १९०५, म्हणजेच या धनत्रयोदशीला १२० वर्षे पूर्ण होऊन उद्याच्या धनत्रयोदशीला १२१ व्या वर्षात पदार्पण करताना त्यांच्या पुसेवाडीतील आगमनाचे औचित्य साधत सुवर्णनगरी श्री क्षेत्र तीर्थक्षेत्र पुसेगाव येथे २०२५ च्या दीपोत्सवातील धनत्रयोदशीला शनिवार, दि. १८ ऑक्टोबर रोजी श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट, पुसेगावकडून प. पू. श्री सेवागिरी महाराज यांचा प्रकट दिन सोहळा होत असून गेल्या १२० वर्षातील साजरा होणारा हा पहिला असा प्रकट दिन सोहळा आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शुक्रवार, दि. १७ रोजी सायंकाळी ७ ते ९ ह. भ. प. पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे कीर्तन व त्यानंतर महाप्रसाद होणार असून धनत्रयोदशी, शनिवार, दि. १८ रोजी पहाटे ५ वाजता श्रींच्या समाधीस महाअभिषेक, सकाळी ७ ते ९ लघुरुद्र व होम-हवन, सकाळी ९.३० ते ११.४० ह. भ. प. बापूसाहेब महाराज देहूकर यांचे कीर्तन, दुपारी ११.५५ वाजता श्रींच्या समाधी व प्रतिमेवर पुष्पवृष्टी आणि दुपारी १२ वाजता नित्य मध्यान्ह आरती व त्यानंतर महाप्रसाद होणार आहे. श्री सेवागिरी महाराजांच्या भक्तगणांनी या १२१ व्या वर्षांपूर्वीच्या प्रकट दिना च्या प्रथम सोहळ्यात सहभागी होऊन आत्मानंद प्राप्त करण्याच्या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन मठाधिपती सुंदरगिरी महाराज, चेअरमन डॉ. सुरेश सर्जेराव जाधव व सर्व विश्वस्त यांच्याकडून करण्यात आले आहे.