१ ) सुनिता कचरे र) सौ. मोनिका मदने ३ ) प्रीती त्रिपुटे ४)सौ. स्मिता साळुंखे
बुध दि . [ प्रकाश राजेघाटगे ]
खटाव तालुक्यातील बुध जिल्हा परिषद गट ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ही याच गटासाठी आरक्षित असल्याने या गटाला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे या गटात कोरेगाव खटावचे विद्यमान आमदार महेशदादा शिंदे व विधानपरिषदेचे आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष आ. शशिकांत शिंदे या दोघांची प्रतिष्ठा पणाला लागण्याची चिन्हे आहेत. पण दोन्ही राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते व कार्यकर्ते कोणत्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत , याचा अजुनही थांगपत्ता लागत नसल्यामुळे कोण कुठल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून उमेदवारी करणार हे अजूनही स्पष्ट नसल्यामुळे येणाऱ्या काळातच कळेल .
मागील जिल्हा परिषद निवडणूकीत बुध गट नवीन झालेल्या पुसेगांव गटात मर्ज करण्यात आला होता. या गटाचे प्रतिनिधीत्व काटेवाडी येथील सौ. सुनिता विजय कचरे यांनी केले होते. आता पुन्हा पूर्वीप्रमाणेच बुध गटाची रचना करण्यात आली आहे. योगायोगाने आरक्षणही ओ.बी.सी. महिला पडल्याने सौ. कचरे यांना पुन्हा रिंगणात येण्याची संधी मिळाली आहे. त्या आ. शशिकांत शिंदे गटाशी सलग्न आहेत. त्यांना जिल्हा नियोजन समितीवर काम करण्याचीही संधी मिळाली होती. त्या माध्यमातून त्यांनी भागातील बहुतांशी गावात छोटी-मोठी विकासकामे केली आहेत. त्यांचे दीर राजेंद्र कचरे यांनी बाजार समितीचे संचालकपद भूषविले असून त्यांचाही गावोगावच्या कार्यकत्यांशी नित्याचा संबंध असतो. त्यामुळे उमेदवारीसाठी त्यांची दावेदारी महत्वाची मानली जाते. याच पक्षाकडून डिस्कळ येथील कार्यकर्ते राजेंद्र शिपटे व बुधचे नितीन गाडे यांच्या घरातील महिला उमेदवाराचीही चर्चा आहे.
दुसर्या बाजूला विद्यमान आ. महेशदादा शिंदे यांच्या गटातून डिस्कळ येथील सौ. मोनिका सागर मदने, पूनम मंदार माळी, बुध येथील प्रिती विकास त्रिपुटे या तीन नावांची चर्चा आहे. यापैकी सौ. मदने या खटाव पंचायत समितीचे माजी उपसभापती लहुकुमार मदने यांच्या सुनबाई आहेत. त्यांचे पती सागर मदने यांनी मागील दोन वर्षापूर्वी झालेल्या डिस्कळ ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपद निवडणूकीत ओपन उमेदवाराच्या विरोधात तगडी फाईट दिली होती. या निवडणूकीत त्यांचा केवळ ५ ते १० अश्या नगण्य मतांच्या फरकाने पराभव झाला होता. या घराण्याला दिवंगत पै. शंकरराव मदने यांच्यापासून समाजकारण, राजकारणाचा मोठा वारसा आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे मदने घराणे लोकांच्या कायम संपर्कात असते. या खेपेस त्यांना आ. महेशदादा शिंदे गटाबरोबर राज्य शासनाच्या सत्तेचा पुरेपूर फायदा मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्याशिवाय या गटातून बुध येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा प्रतिष्ठित बागारयतदार बाळासाहेब त्रिपुटे यांच्या सूनबाई प्रिती विकास त्रिपुटे या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची चर्चा सुरू आहे . त्या बुधचे माजी सरपंच व विद्यमान उपसरपंच अभयसिंह राजेघाटगे यांच्या कट्टर समर्थक म्हणून संपुर्ण गटात परिचित आहेत . अभयसिंह राजेघाटगे यांनी गेल्या सात वर्षात केलेली विकासकामे व संपूर्ण गटात त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांची मजबुत व फळी असल्यामुळे प्रिती त्रिपुटे यांना आमदार महेश शिंदे गटाची उमेदवारी मिळणार अशी चर्चा सुरू आहे . माजी सरपंच अशोकराव पुरे यांच्या घरातील उमेदवाराच्या नावाची चर्चा आहे. गटाचे नांव बुध असले तरी संभाजीराव घाटगे (दादा) यांच्यानंतर अद्याप या मोठ्या गावाला संधी न मिळाल्याने या खेपेस कोणत्याही परस्थितीत संधी घेण्यासाठी प्रमुख कार्यकर्ते आग्रही आहेत.
खटाव पंचायत समितीचे माजी उपसभापती संतोष साळुंखे यांचे विसापूर हे गांव याच गटात येते. त्यांच्या पत्नी, स्मिता साळुंखे यांचेही नांव उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गटातून चर्चेत आहे. श्री. साळुंखे यांनी उपसभापती पदाच्या माध्यमातून भागात केलेले विधायक काम तसेच पत्रकारितेच्या माध्यमातून भागात असणारा उत्तम जनसंपर्क हा त्यांची जमेची बाजू आहे.
प्रा. कोरडे, श्री. चव्हाण कुटुंबियांची भूमिकेकडे लक्ष
बुध गटात शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे नेते प्रा. भानुदास कोरडे यांचे काटेवाडी हे गांव येते. त्यामुळे पक्ष संघटनेच्या अस्तित्वाच्या दॅष्टीने प्रा. कोरडे आपल्या घरातील उमेदवारी देणार की वेगळा पर्याय वापरणार हा औत्सुक्याचा विषय आहे. त्याचबरोबर प्रत्येक निवडणूकीत हिरहिरीने सहभाग घेणारे बुधच्या माजी सभापती प्रभावती चव्हाण व प्रल्हाद चव्हाण सर या दांपत्याची या खेपेस उणीव जाणवणार आहे. त्यांचे वारसदार वडिलार्जीत परंपरा चालविण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरणार का ? तसेच डिस्कळचे अविनाश कर्णे यांच्या घरातील उमेदवार या खेपेस तरी निवडणूक रिंगणात दिसणार का याबाबत वेगवेगळे अंदाज वर्तविले जात आहेत.





Social Plugin