बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
महाराष्ट्रासह आंध्र , गुजरात राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टच्या नूतन चेअरमनपदी संतोष वाघ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. डॉ. सुरेश जाधव यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली होती. आता एक वर्षाच्या कालावधीनंतर डॉ. जाधव यांनी स्वेच्छेने आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने चेअरमनपदाची ही निवडणूक झाली.
आज सोमवारी सकाळी १० वा. चेअरमन पदासाठी ट्रस्टच्या सभागृहात मठाधिपती श्रीमहंत सुंदरगिरी महाराजांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक पार पडली. चेअरमन पदासाठी संतोष वाघ यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर करण्यात आले. बैठकीस विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव, बाळासाहेब उर्फ संतोष जाधव, यांच्या सह ग्रामस्थ मित्रमंडळी तसेच विश्वस्त सचिन देशमुख, गौरव जाधव, सचिव विशाल माने उपस्थित होते.
निवडीनंतर वाघ यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी कामगार आयुक्त सुरेश जाधव, माजी चेअरमन मोहनराव जाधव, बाळासाहेब जाधव, गुलाबराव वाघ, सातारा बिल्डर असोसिएशनचे राजेश देशमुख, उद्योजक मदन जाधव व आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सुंदरगिरी महाराजांनी बोलताना डॉ. सुरेश जाधव यांनी त्यांच्या चेअरमन पदाच्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांचे आणि राबविलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. तसेच श्री सेवागिरी देवस्थानचा कारभार लोकाभिमुख, पारदर्शक आणि राजकारण विरहित होत आहे. देवस्थानचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सर्वांनी सोबत येऊन काम करावे असे आवाहन त्यांनी केले.सूत्रसंचालन विशाल माने यांनी केले. डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव, संतोष जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.
वार्षिक यात्रा महाराष्ट्रासह देशभर वाढविण्यासाठी ट्रस्टमध्ये पुसेगाव आणि पंचक्रोशीतील प्रत्येक ग्रामस्थाचा सहभाग असावा यासाठी प्रयत्नशील असणार आहे. मंदिरात अधिकच्या भौतिक सुविधा वाढविण्यावर भर दिला जाईल.-संतोष वाघ, चेअरमन, श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्ट





Social Plugin