कारंजा लाड प्रतिनिधि पराग कु-हे
कारंजा लाड 'शिवचरित्रातून आपण काय शिकावे' या विषयावर व्याख्यान देताना शिवव्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जडणघडणा मध्ये जिजामातेंच्या संस्कारांचा मोठा वाटा असल्याचे प्रतिपादन केले.
शरद व्याख्यानमाला, पुष्प दुसरे, नानासाहेब दहीहांडेकर (मुलजी जेठा हायस्कूल) प्रांगणात बोलताना डॉ. शेटे म्हणाले की, 'जिजामाता जेव्हा गरोदर होत्या, तेव्हापासून त्यांच्या सात्विक आचरण, पूजा अर्चना, ग्रंथवाचन आणि निश्चयपूर्ण वृत्तीमुळेच शिवरायांचे व्यक्तिमत्त्व घडले. गर्भसंस्काराचा परिणाम थेट बाळाच्या जडणघडणीवर होत असतो. कठीण परिस्थितीत पित्याची व भावांची हत्या झाल्यावरही जिजामातेंनी न डगमगता 'माझा बाळच स्वराज्याची पताका फडकवेल' असा दृढनिश्चय केला होता. शिवरायांनी मातापित्यांच्या आज्ञेचे पालन करत आयुष्यभर व्यसनमुक्त, शिस्तबद्ध व न्यायी राज्यकारभार केला. युद्धातही त्यांनी प्रार्थनास्थळे आणि माता-भगिनींना धक्का लागू नये, असा कठोर दंडक पाळला. आजच्या संदर्भात बोलताना डॉ. शेटे म्हणाले, 'आपण महाराजांचे अनुयायी असल्याचा दावा करतो, पण आपली वागणूक विध्वंसक झाली आहे.
थोर पुरुषांच्या जयंतीला डीजेच्या गोंगाटातून लोकांना त्रास दिला जातो. तरुणपिढी व्यसनाधीन झाली आहे. गर्भवती स्त्रियांनी सात्विक आहार, सकारात्मक विचार आणि उत्तम संस्कार याकडे लक्ष आदर्श द्यायला हवे. युवापिढीने महाराजांचा डोळ्यासमोर ठेवून राष्ट्र बळकट करण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी हरीश केसवानी व उदयसिंग ठाकूर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. निशिकांत परळीकर यांनी शारदा स्तवन सादर केले. संचालन नितीन उजवणे यांनी केले व आभार गोपाल कडू यांनी मानले. श्रोत्यांच्या उपस्थितीने संपूर्ण प्रांगण गजबजून गेले होते




Social Plugin