--- अभ्यासात सातत्य आणि सराव हीच स्पर्धा परीक्षेच्या यशाची गुरुकिल्ली..- श्रीकांत माने, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कारंजा..
गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी
आजचे युग हे 'स्पर्धेचे युग' म्हणून ओळखले जाते.स्पर्धेत टिकायचे असेल तर अभ्यासात सातत्य,जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाबरोबरच उत्तम सरावाची गरज असते. वाशिम जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी दरवर्षी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश पात्रता परीक्षेची तयारी करत असतात. उद्देशपूर्ण तयारी होण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना नवोदयच्या धरतीवर परीक्षाभिमुख प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव होण्याच्या दृष्टीने 'विद्यार्थी हितकारणी शिक्षक मित्र मंडळ' तसेच 'एसआयपी अबॅकस अकॅडमी कारंजा लाड' यांच्यावतीने जिल्हास्तरीय नवोदय सराव परीक्षेचे आयोजन कारंजा येथील ब्ल्यू चिफ कॉन्व्हेंट येथे करण्यात आले.
या सराव परीक्षेमध्ये 600 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी आपला प्रतिसाद नोंदवला.सकाळी दहा वाजता पासून नोंदणीला सुरुवात करुन ठीक अकरा वाजता परीक्षा सुरू करण्यात आली.अतिशय शिस्तबद्ध व्यवस्थापन, दर्जेदार सराव संच आणि भयमुक्त वातावरणांत ही सराव परीक्षा पार पडली. सराव परीक्षेकरिता जिल्हाभरातून तसेच यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा व दिग्रस येथून ,अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथून तसेच अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी या शेजारच्या तालुक्यातूनही अनेक विद्यार्थी परीक्षेकरिता उपस्थित होते.
सराव परीक्षेच्या आयोजनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तात्काळ आणि पारदर्शी निकाल.विद्यार्थ्यांना आपल्या चुका कळाव्यात या उद्देशाने तपासलेल्या उत्तरपत्रिका परीक्षेनंतर लगेचच उपलब्ध करून देण्यात आल्या. सर्वाधिक गुण घेऊन सम्राट प्रवीण बेलखेडे यांने प्रथम तर, देवांश भावनागरे यांने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. रेणुका पारसलकर, हरीष अराळे, प्राची थोरात आणि श्लोक जळकोटे यांना समान गुण असल्यामुळे तिसरा क्रमांक विभागून देण्यात आला. चौथ्या क्रमांकाचे गुण घेणाऱ्या चार तसेच पाचव्या क्रमांकाचे गुण घेणाऱ्या चार विद्यार्थींना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. दोन विद्यार्थ्यांना विशेष प्रोत्साहन पर बक्षीस देऊन त्यांचेही कौतुक करण्यात आले. त्याचबरोबर इतर सतरा विद्यार्थ्यांनाही त्यांनी उत्तम गुण प्राप्त केल्याबद्दल बक्षीसे देऊन गौरवण्यात आले.
बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून कारंजा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्रीकांत माने यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती दिग्रस येथील उच्च श्रेणी मुख्याध्यापक प्रकाश देशमुख,गोविंद इंग्लिश स्कूल चे संतोष चौधरी कारंजा येथील आदर्श शिक्षिका निशा खुमकर यांची उपस्थिती लाभली. बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या प्रसंगी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना "ग्रामीण तसेच तळागाळातील जास्तीत जास्त विद्यार्थी नवोदय पात्रता परीक्षेत यशस्वी व्हावेत ,त्यांचा स्पर्धा परीक्षांचा पाया भक्कम व्हावा, या दृष्टीने ही सराव परीक्षा अत्यंत लाभदायी ठरणार आहे."असे प्रतिपादन कारंजा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्रीकांत माने यांनी केले. सदर सराव परीक्षेचे मुख्य संयोजक म्हणून सतीश क्षिरसागर व श्रीकांत इंगोले यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पडली. परीक्षेच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यार्थी हितकारणी शिक्षक मित्र मंडळ मंगरूळपीर,कारंजा, आणि मानोरा येथील बहुसंख्य शिक्षकांचे महत्त्वपूर्ण योगदान लागले. सोबतच पंचायत समिती बार्शीटाकळी व दारव्हा, दिग्रस येथील शिक्षकांनी सहकार्य केले. ब्ल्यू चिफ कॉन्व्हेंट तसेच गोविंद कॉन्व्हेंट येथील शिक्षक आणि कारंजा येथील सक्सेस अकादमी येथील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले महत्त्वपूर्ण योगदान देऊन ही परीक्षा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी बहुमोलाचे सहकार्य केले. अशा सराव परीक्षांच्या यशस्वी आयोजनाचा विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होईल तसेच स्पर्धा परीक्षांबद्दलची त्यांच्या मनातील भीती दूर करण्यास मदत होईल असा पालकांनी विश्वास व्यक्त केला.





Social Plugin