अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगरच्या आंतरविद्या शाखेअंतर्गत जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागाचे विद्यार्थी भानुदास लक्ष्मण दोबाले यांना त्यांच्या महत्त्वपूर्ण संशोधनासाठी मास्टर ऑफ फिलॉसॉफी (M.Phil.) ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. दोबाले यांच्या शोधप्रबंधाचा विषय सामाजिक, साहित्यिक व संवादशास्त्रीय दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण आहे.
“साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातून मागास समाजाला मिळालेली वैचारिक भूमिका : एक संवादशास्त्रीय अभ्यास”या विषयावर त्यांनी सखोल विश्लेषण करून आपले संशोधन पूर्ण केले.अण्णाभाऊ साठे यांच्या लेखनातून समाजातील वंचित घटकांना मिळालेली नवी ओळख,वैचारिक दिशा व सामाजिक समतेचे भान यावर त्यांनी विचार प्रवर्तक प्रकाश टाकला आहे.
अण्णाभाऊ साठे यांच्या कथा,कादंबऱ्या व लावण्यांमधील मागास समाजाचे चित्रण,त्यांच्या व्यथा–वेदना–संघर्ष व तळागाळातील नायक/नायिका उभे करण्याची त्यांची लेखणी,यांचे त्यांनी चिकित्सक अध्ययन केले आहे.साठे यांच्या साहित्याने वंचित समाजाला मिळालेले वैचारिक सामर्थ्य त्यांनी प्रभावीपणे उलगडले आहे.
या संशोधनासाठी विभागप्रमुख डॉ.दिनकर माने यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच डॉ.सोमीनाथ खाडे, डॉ. दिवाकर कुलकर्णी,डॉ.प्रसन्न पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.दोबाले यांनी ही पदवी A ग्रेड सह मिळवून आपल्या शैक्षणिक प्रवासात उल्लेखनीय यश मिळवले. याशिवाय,आर्ट ऑफ लिविंग परिवाराच्या वतीने डॉ.आत्माराम नाटकर, मा.सरपंच शिवाजी बामणे, योगेश हेंद्रे,संतोष काकडे,बबनराव पंचलोटे व माऊली दोबोले यांनी दोबाले यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सामाजिक भान जपणाऱ्या आणि विचारप्रवर्तक संशोधनामुळे भानुदास दोबाले यांचे सर्वत्र कौतुक होत असून,त्यांच्या यशाने सामाजिक विषयांवरील संशोधनाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.





Social Plugin