Ticker

6/recent/ticker-posts

४१ व्या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचे अंबाजोगाईत आयोजन.



 वैभव सोळंके/तालुका प्रतिनिधी 

यशवंतराव चव्हाण स्मृती समिती, अंबाजोगाई
४१ व्या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचे अंबाजोगाईत आयोजन.
*डॉ. कमलताई गवई, श्रीकांत देशमुख, डॉ.अशोक ढवण, यांच्या उपस्थित व पं. मुकेश जाधव यांचे तबला वादन  व कृष्णा बोंगाणे यांच्या  स्वरांनी मैफल रंगणार*

अंबाजोगाई –  यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीने दरवर्षी आयोजित केल्या जाणार्‍या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचे यावर्षी ४१ वे वर्ष असून तीन दिवसीय कार्यक्रमात उद्घाटन समारंभ, कवी संमेलन, सुगम संगीत, शालेय चित्रकलाव बाल आनंद.मेळावा, शेतकरी परिषद, शास्त्रीय संगीत कार्यक्रम,  यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार वितरण, समारोप समारंभ असा संपन्न होणार आहे.

अंबाजोगाईत गेल्या ४० वर्षांपासून सातत्याने यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीने वैविध्यपुर्ण, वैचारिक, वाङ्मयीन, सांगितीक, सांस्कृतिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार, कृषिविषयक प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा व प्रदर्शन तसेच ग्रंथ प्रदर्शन असे विविध कार्यकम आयोजित केले जातात. अंबाजोगाई व मराठवाड्याचा सांस्कृतिक, सामाजिक, साहित्यिक, वैचारिक वारसा जोपासण्याचा व दृढ करण्याचा प्रयत्न केला जातो. यावर्षी ४१ वा यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह दि.२५, २६ व  २७ नोव्हेंबर मंगळवार, बुधवार व गुरुवार असा संपन्न होणार आहे अशी माहिती समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी दिली.

*उद्घाटन व कवी संमेलन*

मंगळवार, दि.२५ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५. ३० वा. या समारोहाचे उद्घाटन नांदेड  येथील साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध लेखक श्रीकांत देशमुख  यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

रात्रौ ८.३० वा. कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून अध्यक्षस्थानी नांदेड येथील येथील ज्येष्ठ कवी प्रा.डॉ. पी. विठ्ठल हे राहणार असून, कवी संमेलनाचे सूत्रसंचालन घाटनांदूर  येथील सुप्रसिद्ध कवी अविनाश भारती  करणार आहेत. तर सुप्रसिध्द कवी सर्वश्री  शरद धनगर–अमळनेर, पुनीत मातकर– यवतमाळ, अनंत राऊत–अकोला, डी.की. शेख– धाराशिव, लता ऐवळे कदम– सांगली, अविनाश काठवटे– छत्रपती संभाजीनगर, गुंजन पाटील– सोयगाव, गजानन मते–अमरावती, सुनील उन्हाळे–छत्रपती संभाजीनगर , सय्यद चांद तरोडकर– परभणी व आत्माराम जाधव–गंगाखेड यांचा सहभाग राहणार आहे.

बुधवार, दि.२६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ८ वाजता ८  वी ते १० वी शालेय विद्यार्थ्यांसाठी  चित्रकला  स्पर्धा  आयोजित केली आहे.  सकाळी १०. ३०  वाजता बाळ आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून त्यातच चित्रकला स्पर्धा विजेत्यांना बक्षीस वितरण केले जाईल. सुप्रसिद्ध साहित्यिक विठ्ठल जाधव–शिरूर कासार हे अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार असून अंबाजोगाई येथील प्रसिद्ध चित्रकार त्र्यंबक पोखरकर हे पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.  यावेळी ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.

*सोबतीचा करार*

सायंकाळी ८ वाजता पुणे येथील सुप्रसिद्ध  कवी  वैभव जोशी यांच्या कविता व गझलेवर आधारित  "सोबतीचा करार" या संगीत मैफिल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.असून यात दत्तप्रसाद रानडे गायन करतील तर त्यांना सिंथसायजेर व सहगायन निनाद सोलापूरकर,  तबला  समीर शिवगार, ढोलक आमोद कुलकर्णी हे साथ करतील. या सर्व रचनांचे संगीतकार आशिष मुजुमदार यांनी संगीत दिले असून तेही  साथ करणार आहेत.

गुरुवार दिनांक २७ नोव्हेंबर २९२५ रोजी सकाळी १०.३० वाजता शेतकरी परिषदेचे आयोजन करण्यात आले असून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अशोक ढवण हे यशवंतराव चव्हाण यांचे कृषी–औद्योगिक धोरण आणि वर्तमान शेती यावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतील. अध्यक्षस्थानी केळसांगवी ता. आष्टी येथील प्रयोगशील महिला शेतकरी श्रीमती विजया गंगाधर घुले या असणार आहेत. त्यांनी शेतीत केलेले प्रयोग व  देशी विदेशी फळबाग व उत्पादन याविषयी अनुभव सांगणार आहेत.

*समारोप समारंभ व पुरस्कार वितरण*

सायंकाळी ५.३० वाजता या समारोहाचा समारोप समारंभ होत असून अध्यक्षस्थानी अमरावती येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व शिक्षण तज्ज्ञ डॉ. कमलताई रामकृष्ण गवई ह्या उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.

यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्काराचे मानकरी श्रीमती विजया गंगाधर घुले– केळसांगवी ता.आष्टी  यांना कृषी,  केशव वसेकर–परभणी यांना साहित्य, पं. मुकेश जाधव–पुणे यांना संगीत व कळमअंबा ता. केज येथील विश्वविजेत्या भारतीय महिला खो खो संघाची कर्णधार कु. प्रियंका हनुमंत  इंगळे हिला क्रीडा युवा गौरव पुरस्कार  प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप शाल, स्मृतिचिन्ह, पुष्पहार, रोख पाच हजार रुपये असे आहे. याच समारंभात यशवंतराव चव्हाण स्मृती समितीचे मार्गदर्शक रसिकाग्रणी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भगवानराव शिंदे बप्पा यांचा विशेष सन्मान कमलताई गवई यांच्या हस्ते करण्यात येईल.

*शास्त्रीय संगीत संभा*

समारोप समारंभानंतर रात्री ८ .३० वाजता शास्त्रीय संगीत सभेचे आयोजन करण्यात आले असून यात जगप्रसिद्ध तबलावादक पं. मुकेश जाधव यांचे तबला सोलो वादन होईल त्यांना संवादिनीवर अभिषेक शिनकर साथ करतील. त्यानंतर आघाडीचे आंतरराष्ट्रीय शास्त्रीय गायक कृष्णा बोंगाणे यांचे गायन होईल. त्यांना तबल्यावर आशय कुलकर्णी  व संवादिनीवर अभिषेक शिनकर हे साथसंगत करतील.

*ग्रंथ प्रदर्शने व कला दालने*

दर वर्षी प्रमाणे या तिन्ही दिवशी ग्रंथ विक्री व प्रदर्शन, चित्रकला, हस्तकला प्रदर्शने भरवली जाणार आहेत. हे सर्व कार्यक्रम  वेणूताई चव्हाण महिला महाविद्यालय अंबाजोगाई येथे पार पडतील. सर्व नागरिक, विद्यार्थी, रसिकांनी या समारंभास उपस्थित रहावे असे आवाहन समितीचे सचिव दगडू लोमटे, इतर पदाधिकारी डॉ. कमलाकर कांबळे, सतीश लोमटे, प्रा. सुधीर वैद्य, डॉ .प्रकाश प्रयाग, प्रा. भगवान शिंदे, प्रा. शर्मिष्ठा लोमटे, त्र्यंबक.पोखरकर, मार्गदर्शक भगवानराव शिंदे व राजपाल लोमटे यांनी केले आहे.