Ticker

6/recent/ticker-posts

माहूर तालुक्यातील पालाईगुडा येथे रंगला प्रो कबड्डी सामन्यांचा थरार..



शेख अमिरपाशा 

किनवट : पालईगुडा तालुका माहूर, जिल्हा नांदेड येथे 'संत श्री चापादास महाराज कबड्डी महाचषक' अंतर्गत आयोजित करण्यात आलेली ऑल इंडिया भव्य कबड्डी स्पर्धा नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली. दि. २७ व २८ डिसेंबर २०२५ रोजी चापादास महाराज स्टेडियमवर पार पडलेल्या या स्पर्धेत राज्यभरातील नामवंत व ताकदवान संघांनी आपला सहभाग नोंदवला होता. या भव्य स्पर्धेचे आयोजन समस्त गावकरी मंडळ, पालईगुडा यांच्या वतीने करण्यात आले असून, स्पर्धेचे उद्घाटन डॉ. धनंजय भारती गुरु आनंद भारती यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून सिंदखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. रमेश जाधवर यांची उपस्थिती होती.

प्रो-कबड्डीच्या नियमांनुसार खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेत विजेत्या संघांना आकर्षक रोख रकमा आणि चषक देऊन गौरवण्यात आले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत 'मुंबई शहर' संघाने प्रथम क्रमांक पटकावत ७१,००० रुपयांचे पारितोषिक आपल्या नावे केले. 'मिडलाईन मुंबई' संघ ५१,००० रुपयांच्या द्वितीय पारितोषिकाचा मानकरी ठरला, तर तृतीय क्रमांक 'माहुरगड टीम' (४१,००० रुपये) आणि चतुर्थ क्रमांक 'बी. सी. फाउंडेशन, असोली' (३१,००० रुपये) या संघाने पटकावला.

या स्पर्धेचे मुख्य संकल्पक व मुख्य प्रायोजक म्हणून माननीय प्रशांत पुरसिंग राठोड (किनवट/माहूर) यांचे मोलाचे योगदान लाभले. ग्रामीण भागात कबड्डीसारख्या पारंपरिक खेळाला प्रोत्साहन मिळावे, तरुण पिढी खेळाकडे आकर्षित व्हावी आणि स्थानिक खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंसोबत खेळण्याचा अनुभव मिळावा, या उद्देशाने या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमुळे संपूर्ण परिसरात कबड्डीचा मोठा उत्साह पाहायला मिळाला असून, खेळाडूंना आपले कौशल्य सादर करण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले होते.