Ticker

6/recent/ticker-posts

दौंडच्या शेतकऱ्याची 'जागतिक' दखल; नॉर्वेच्या संशोधन संस्थेकडून श्री. केशव होले यांचा गौरव.



गणेश गावडे-पाटस प्रतिनिधी

पाटस:हवामान बदलाच्या संकटात पारंपरिक शेतीला विज्ञानाची जोड देणाऱ्या दौंड तालुक्यातील बिरोबावाडी येथील प्रगतीशील शेतकरी श्री. केशव बबनराव होले यांच्या कार्याची दखल थेट युरोपातील नॉर्वे देशाने घेतली आहे. नॉर्वेजियन रिसर्च सेंटर (NORCE) मधील शास्त्रज्ञ प्रतीक कड यांनी होले यांच्या 'डेटा-चालित' (Data-driven) शेती पद्धतीचे विशेष कौतुक करत त्यांना प्रशंसापत्र देऊन गौरविले आहे.​​आजच्या काळात हवामानातील अनिश्चितता वाढली आहे. अशा परिस्थितीत केशव होले (सर) यांनी आपल्या शेतात केवळ पीक न घेता, विज्ञानाचा अवलंब केला आहे. ते आपल्या शेतातील दैनंदिन बदल, पिकांच्या पद्धती आणि हवामानातील बदल यांची नोंद एका विशेष 'निरीक्षण वहीत' ठेवतात. त्यांच्या या पद्धतशीर नोंदींमुळे शेतीतील चुका शोधणे आणि योग्य निर्णय घेणे सोपे जाते.​काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे केशव होले यांच्या कलिंगडाच्या शेतीचे मोठे नुकसान झाले होते. मात्र, खचून न जाता त्यांनी या नुकसानाचे तांत्रिक विश्लेषण केले. त्यांच्या याच चिकाटीने नॉर्वेमधील 'बजर्कनेस सेंटर फॉर क्लायमेट रिसर्च' येथील संशोधक प्रभावित झाले आहेत. "भारतात हवामान लवचिक शेती निर्माण करण्यासाठी केशव होले यांचा डेटा-आधारित दृष्टिकोन हा इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श आहे," असे गौरवद्गार संशोधक प्रतीक कड यांनी पत्राद्वारे काढले आहेत.​ग्रामीण भागातील एका शेतकऱ्याने जागतिक दर्जाच्या संशोधन संस्थेचे लक्ष वेधून घेतल्याने संपूर्ण पुणे जिल्ह्यात त्यांचे कौतुक होत आहे. केवळ कष्ट न करता, त्याला नोंदी आणि विज्ञानाची जोड दिल्यास निसर्गाच्या लहरीपणावर मात करता येते, हेच केशव होले यांनी सिद्ध केले आहे.