प्रतिनिधी देवानंद महाजन
निवघा बा येथील सिद्धी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यांच्यावतीने छत्रपती संभाजीनगर येथे ऐतिहासिक सहल आयोजित केली होती. या सहलीमध्ये अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या सहलीदरम्यान बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या घृष्णेश्वर महादेवाचे दर्शन घेण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी जगप्रसिद्ध वेरूळ व अजिंठा लेणींना भेट दिली. येथील बौद्ध, जैन व हिंदू लेण्यांची अप्रतिम स्थापत्यकला पाहून विद्यार्थ्यांची इतिहासाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली.
यानंतर विद्यार्थ्यांनी भारतातील सुप्रसिद्ध व भव्य दौलताबाद किल्ला पाहिला. या किल्ल्यांची रचना, प्राचीन प्रवेशद्वारे, मजबूत तटबंदी आणि संरक्षणव्यवस्था पाहून विद्यार्थी प्रभावित झाले. किल्ल्यांशी संबंधित विविध ऐतिहासिक घटना विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आल्या.सहल पुढे श्री भद्रा मारुती मंदिर, तसेच सिद्धार्थ गार्डन येथील हिरवळ, प्राणी संग्रहालय आणि रम्य वातावरणाचा सर्वांनी मनमुराद आनंद घेतला. विद्यार्थ्यांनी विविध खेळ खेळून, प्राण्यांचे निरीक्षण करून आणि निसर्गाचा आस्वाद घेत सहलीचा आनंददायी शेवट केला.
शिक्षकांनी सांगितले की, अशा सहलीमुळे विद्यार्थ्यांना पुस्तकाबाहेरील ज्ञान मिळते आणि इतिहासाशी प्रत्यक्ष परिचय होतो. विद्यार्थ्यांनीही ही सहल अविस्मरणीय असल्याचे सांगून शालेय व्यवस्थापनाचे आभार मानले.





Social Plugin