Ticker

6/recent/ticker-posts

दुधगावच्या सुपुत्राचा जागतिक सन्मान; संदीप हेगडे यांना प्रतिष्ठेचा राऊंडटेबल पुरस्कार.



दुधगांव-वार्ताहर - निखिल नलवडे

सांगली जिल्ह्यातील दुधगाव गावाने पुन्हा एकदा जागतिक स्तरावर आपले नाव उज्वल केले आहे. गावचे सुपुत्र, युवा संशोधक संदीप हेगडे यांना कॉमनवेल्थ संस्थेकडून दिला जाणारा राऊंडटेबल २०२५–२६ पुरस्कार जाहीर करण्यात आला असून, ही दुधगावसह संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब ठरली आहे.

जगातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित राष्ट्रकुल धोरण संशोधन संस्थांपैकी एक असलेल्या कॉमनवेल्थकडून मिळणारा हा पुरस्कार संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दिला जातो. दुधगावसारख्या ग्रामीण भागातून आलेल्या संशोधकाला असा आंतरराष्ट्रीय सन्मान मिळणे ही गावाच्या बौद्धिक परंपरेची साक्ष देणारी घटना आहे.

संदीप हेगडे यांनी आपले उच्च शिक्षण देशातील अग्रगण्य संस्था आय.आय.टी. बॉम्बे येथून पूर्ण केले आहे. सध्या ते युनिव्हर्सिटी ऑफ एडिंबर्ग (यू.के.) या जगातील अव्वल ३० विद्यापीठांपैकी एका विद्यापीठात रिसर्च फेलो म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या संशोधन कार्याची दखल जागतिक पातळीवर घेतली जात असून, या पुरस्कारामुळे दुधगावचे नाव आंतरराष्ट्रीय शैक्षणिक व संशोधन नकाशावर ठळकपणे उमटले आहे.

या पुरस्कारांतर्गत संदीप हेगडे यांना युनिस्को संलग्न जागतिक विज्ञान परिषदेशी संबंधित सदस्य संस्थेत कार्य करण्याची संधी मिळणार आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथील प्रतिष्ठित ह्यूमन सायन्स रिसर्च कौन्सिल या सामाजिक विज्ञान क्षेत्रातील मानाच्या संस्थेत ते संशोधन कार्य करणार आहेत.

दुधगावच्या एका तरुणाने जागतिक पातळीवर मिळवलेले हे यश गावातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, शिक्षण आणि संशोधनाच्या माध्यमातून ग्रामीण भागही जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करू शकतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.