गणेश गावडे-पाटस प्रतिनिधी
उप अभियंत्यांचे आश्वासन: ४-५ दिवसांत काम सुरू करू; ग्रामस्थांना दिलासा की निव्वळ पोकळ शब्द?
पुणे/बिरोबावाडी: पुणे जिल्हा परिषदेच्या (जिवायो सन २०२३-२४) विशेष अनुदानातून बिरोबावाडी येथील अंतर्गत रस्त्यासाठी मंजूर झालेला २० लाख रुपयांचा निधी कागदावरच अडकला आहे. हा रस्ता पूर्ण करण्याची अंतिम मुदत (मार्च २०२५) उलटून आता वनविभागाच्या परवानगीअभावी गेली ९ महिने अपूर्ण असलेले हे काम आता दहा महिने पूर्ण करूनही 'जैसे थे' अवस्थेत आहे. पावसाळा संपूनही रस्त्यावर धोकादायक खडी तशीच असल्याने ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि महिलांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे. आणि यावर कोणीही जबाबदारी घेण्यास तयार नाही. २० लाख रुपयांचे काम सुरू करण्यापूर्वी प्राथमिक स्तरावर आवश्यक कागदपत्रे आणि वनविभागाची परवानगी का घेतली गेली नाही? या प्रशासकीय त्रुटीवर एका महिन्याच्या कालावधीतही तोडगा निघाला नाही, याबद्दल नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. तसेच ग्रामसेविकेचा जुनाच पवित्रा आहे. गावातील सुस्तः लोकप्रतिनिधीही गावाच्या विकासासाठी उदासीन असलेले ग्रामपंचायत सदस्य आलेले काम सुद्धा पूर्ण करून घेण्यास असमर्थ ठरले आहेत. या गंभीर विषयावर जिल्हा परिषद व वनविभागाने तातडीने समन्वय साधून रस्त्याच्या परवानगीचा प्रश्न मार्गी लावावा आणि उप अभियंत्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करावे, अशी मागणी बिरोबावाडीचे ग्रामस्थ करत आहेत. या कामाच्या देखरेखीची जबाबदारी असलेल्या उप अभियंत्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की ते काम तेथील लोकांकडून थांबवण्यात आले आहे परंतू त्यांचे नाव सांगण्यास मात्र नकार दिला व पुढील चार-पाच दिवसांत रस्त्याचे काम पुन्हा सुरू करू असे आश्वासन दिले आहे. प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्यांकडून हे आश्वासन मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये उत्सुकता आहे, मात्र १० महिने उलटूनही रस्त्यावर खडी असल्याने, हे आश्वासन प्रत्यक्षात उतरणार की नाही, याबाबत ग्रामस्थांमध्ये शंका व्यक्त होत आहे. मागील महिन्यात बातमी देऊनही जिल्हा परिषद आणि वनविभागाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही.





Social Plugin