Ticker

6/recent/ticker-posts

स्मशानभूमी स्वच्छता उपक्रम सामाजिक जाणीव ..



बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे ] 

  वेटणे गावातील सार्वजनिक आरोग्य व पर्यावरण स्वच्छतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा स्मशानभूमी स्वच्छता उपक्रम पुसेगाव येथील कला वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि  वेटणे ग्रामपंचायत, स्थानिक सामाजिक  कार्यकर्ते यांच्या संयुक्त सहभागातून हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

स्मशानभूमी ही प्रत्येक गावाची अत्यंत संवेदनशील  जागा असून, काळाच्या ओघात तेथे कचरा साचणे, काटेरी झुडपे वाढणे व अस्वच्छता निर्माण होणे अशी स्थिती अनेक ठिकाणी दिसून येते. यामुळे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन गावातील नागरिकांनी एकत्र येत स्वच्छतेचा संकल्प केला.स्वच्छता मोहिमेदरम्यान प्लास्टिक कचरा, कागद, बाटल्या, सुका कचरा व इतर टाकाऊ साहित्य संकलित करून योग्य ठिकाणी विल्हेवाट लावण्यात आली. तसेच वाढलेली झुडपे, गवत कापून परिसर मोकळा व स्वच्छ करण्यात आला. प्रवेश मार्ग मोकळा करण्याचे कामही करण्यात आले.

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी श्रमदानातून सामाजिक जबाबदारीचे भान दाखविले. स्मशानभूमी स्वच्छ ठेवणे ही केवळ स्वच्छतेची नव्हे तर संस्कारांचीही बाब आहे. अशा उपक्रमांमुळे गावातील एकोपा वाढतो आणि पुढील पिढीमध्ये सामाजिक भान निर्माण होते . स्मशान भूमी स्वच्छता उपक्रमाने गावात सकारात्मक संदेश देत सामाजिक व पर्यावरणीय जाणीव अधिक दृढ केली आहे. यावेळी कार्यक्रम अधिकारी प्रा.डाॅ.के.जी.कुंभार, कार्यक्रम अधिकारी प्रा.डाॅ.एच.जी.निमसे.तसेच.प्रो.डाॅ.एस.आर.शिंदे श्री.विजय नलवडे इ.उपस्थित होते शिबिरातील सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते.