Ticker

6/recent/ticker-posts

मातीशी नाळ जुळलेली, तिरंग्याशी निष्ठा : शेतकरी कुटुंबातील युवकाची भारतीय लष्करात लेफ्टनंटपदी घवघवीत भरारी.



बुध  दि . [ प्रकाश राजेघाटगे 

 सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या जन्माने पावन झालेल्या भोसरे या छोट्या गावातील शेतकरी, कष्टकरी व एकत्र कुटुंब पद्धतीची पार्श्वभूमी असलेल्या सुजित संपत जाधव या पट्ट्याने सरसेनापतींचा लढवय्या बाणा दाखवत, शेतातील मातीशी नाळ घट्ट जपत देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगले व नुसते बाळगले नाही तर भारतीय लष्करात लेफ्टनंट पदाला गवसणी घालण्याची असामान्य कामगिरी केली आहे.ग्रामीण भागातील तरुणांसाठी आशेचा नवा दीप प्रज्वलित करणारी ही त्याची यशोगाथा आहे.

          लहानपणापासून शेतीकामाची ओळख, पहाटेची राब आणि मर्यादित साधनांमध्ये शिक्षण या वातावरणात सुजितने देशासाठी काहीतरी करण्याचा संकल्प केला. शेतात काम करून आलेल्या, दमलेल्या शरीराला विश्रांती न देता त्याने अभ्यास, शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक तयारी यांवर सातत्याने भर दिला. घरच्या जेमतेम परिस्थितीत शिक्षणाचा वारसा नसताना  खेड्यात शैक्षणिक सुविधांची आबाळ अशा सर्वच बाजूंनी अनिश्चितता असताना पट्ट्याचा आत्मविश्वास कधी ढळला नाही.कठोर प्रशिक्षणाच्या काळात त्याने शिस्त, नेतृत्वगुण आणि सहनशक्ती यांचे उत्तम दर्शन घडवले. 

       आपलं प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण गावातच पूर्ण केलं. दहावीत ९३ टक्के गुण मिळवून सुजीतने सातारच्या यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज मध्ये स्वतःला आजमावण्यासाठी प्रवेश घेतला. बारावीत ही त्याने आपल्या उज्वल निकालाची परंपरा टिकवत ८६ टक्के गुण मिळवले. त्यानंतर पुण्यातील VIIT इंजिनिअरिंग कॉलेजमधून प्रथम श्रेणी मिळवत पदवी प्राप्त केली. या दरम्यान त्याला N.C.C. मध्ये प्रवेश मिळाला.तिथंच त्याच्या स्वप्नांना दिशा मिळाली व देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून भारतीय लष्करात सेवा करण्याचा त्याने निर्धार केला. ठरविल्याप्रमाणे त्याची मद्रास इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये ( MEG ) प्रदीर्घ प्रयत्नांनंतर  लेफ्टनंटपदी नियुक्ती झाली आणि एका सामान्य शेतकरी कुटुंबाचे स्वप्न राष्ट्राच्या सेवेचे ध्येय बनले.इंडियन मिलिटरी अकॅडमी डेहराडून येथे झालेल्या टेक्निकल ग्रेड्युएट कोर्समध्ये ऑर्डर ऑफ मेरिट मध्ये प्रथम क्रमांक पटकावून भोसरे गावचे नाव राज्यात उंचावले. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या हस्ते त्याला TGC सिल्वर मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.

             या यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण आहे. ग्रामस्थ, शिक्षक आणि मित्रपरिवार यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला. “एकत्र कुटुंबपद्धतीत झालेली माझी जडणघडण, आजी–आजोबांचे संस्कार, वडील आणि चार चुलत्यांचे कष्ट, तसेच सर्व कुटुंबीयांची साथ महत्त्वाची ठरली. एकाच छताखाली राहून शेतीची जबाबदारी सामूहिकपणे पेलताना शिस्त, संयम आणि परस्परावलंबनाची शिकवण मला बालपणापासून मिळाली.

कुटुंबातील सदस्यांचे कष्ट, गुरुजनांचे मार्गदर्शन आणि गावकऱ्यांचे आशीर्वाद यांमुळेच हे यश शक्य झाले,” अशी कृतज्ञ भावना यावेळी सुजीतने व्यक्त केली.

 

 माजी सरपंच नितीन जाधव (माजी सरपंच )  " सरसेनापती प्रतापराव गुजर  व या मातीबद्दलची निष्ठा तसेच तिरंग्याशी प्रामाणिकपणा जपणारी माझ्या भावाची यशकथा येणाऱ्या पिढीला निश्चितच संघर्षातून यशाकडे  दिशा दाखवणारी असून कठोर मेहनत, शिस्त आणि देशप्रेम यांच्या बळावर कोणतेही आव्हान पार करता येते हे त्याने सिद्ध केले याचा सार्थ अभिमान वाटतो."