बुध दि . [ प्रकाश राजेघाटगे ]
राजकारणात नेते हुशार असतात,तर काही जण चतुर असतात परंतु दीर्घकालीन राजकारण स्थापित करायचे असेल तर वेळकाढूपणा आणि समय सूचकता ही सूत्रे अंगीकारली की, सत्ता केंद्र त्या व्यक्तीच्या हातात राहण्याची शक्यता वाढते ही वर्तमान काळातील नेत्यांची कला आहे. त्यामध्ये निष्ठा व तत्वे जरी बदलली तरी सत्तेमध्ये भागीदारी मिळते अशी भावना आजकाल जोर धरत आहे असे दिसून येत आहे. त्यामुळे पक्षाच्या ध्येय धोरणाचा पालापाचोळा होऊन व्यक्ती केंद्रित राजकारणाचा उदय होताना दिसत आहे आणि हेच कारण लोकशाहीला मारक आहे.
नुकताच जाहीर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमुळे सातारा जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. दोन्ही राष्ट्रवादी एक झाल्याने महायुतीतील भाजपा व शिवसेना एकत्र येतील ही आशा जिल्ह्यातील जाणकारांना होती परंतु ती फोल ठरली आहे. एक कोरेगाव विधानसभा सोडल्यास जिल्ह्यात कुठेही भाजप शिवसेना युती झाली नाही. परंतु संपूर्ण जिल्ह्यात न झालेली युती कोरेगावातच कशी झाली याची गौडबंगाल मोठे मजेशीर आहे.2019 च्या विधानसभा निवडणुकी अगोदर श्री महेश शिंदे यांनी भाजपामधून तत्कालीन शिवसेनेत प्रवेश केला. या निवडणुकीत ते विजयी झाले असले तरी त्यांनी त्यांच्याबरोबर असलेल्या कार्यकर्त्यांचा भाजपा प्रवेश घेतला नाही. त्यामुळे आमदार सेनेचा आणि कार्यकर्ते भाजपाचे असे चित्र गेली सहा वर्ष पाहत आहोत. पण होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी त्यांनी अतिशय तल्लखपणे दोन्ही पक्षाकडे आपल्या समर्थकांची उमेदवारी मिळवली आहे.
कोरेगाव विधानसभा मतदारसंघात खटाव तालुक्यातील दोन व सातारा तालुक्यातील दोन महसुली मंडलाचा सहभाग आहे. या दोन्ही तालुक्यात विद्यमान आमदारांनी आपल्या समर्थकांसाठी भाजपा या पक्षाचा वापर केला आहे. यात त्यांच्या पत्नी सौ. प्रियाताई शिंदे या स्वतः खटाव जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर काही लोक टीका करत असले तरी त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे कारण येणाऱ्या भविष्यकाळातील संधी होणाऱ्या टीकेपेक्षा कितीतरी मोठी आहे.कोरेगाव तालुक्यात शिवसेनेला मानणारा एक मोठा वर्ग आहे त्यामुळे आमदार श्री महेश शिंदे यांनी सर्व उमेदवार धनुष्यबाण या शिवसेना( शिंदे गट ) या चिन्हावर मैदानात उतरले आहेत. कारण याआधी भाजपाच्या चिन्हावर कोरेगाव तालुक्यात कधीच यश संपादन झाले नाही.
मागील काही निवडणुकीत भाजपाने भरीव यश संपादन केले आहे. पश्चिम महाराष्ट्राची स्थिती पाहता सातारा जिल्ह्यात भाजपाचे चार आमदार आहेत. यामध्ये सातारा व माण मतदारसंघातील आमदादारांना राज्य मंत्रिमंडळात स्थान आहे. उर्वरित दोन लोकप्रतिनिधी मध्ये कराड दक्षिणचे आमदार श्री अतुल भोसले हे जिल्हाध्यक्ष आहेत त्यामुळे जर भाजपाची सत्ता जिल्हा परिषदेत येत असेल तर महत्त्वाची पदे कोरेगाव किंवा कराड उत्तर या मतदारसंघात मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात जिल्हा परिषदेत सत्तेचा वाटा आमदार श्री महेश शिंदे यांच्या मतदारसंघात मिळू शकतो त्यामुळेच त्यांनी खटाव व सातारा तालुक्यात भाजपा तर कोरेगाव तालुक्यात शिवसेना असे उमेदवार दिले आहेत अशी चर्चा सुरू आहे
*नवरा-बायको दोन्ही उमेदवार?*
आम्ही सुरुवातीलाच म्हटले आहे की, हे मिशन जिल्हा परिषदेचे असले तरी लक्ष 2029 च्या विधानसभेकडे आहे. 2029 च्या विधानसभेत सातारा जिल्ह्यात दोन नवीन मतदार संघाची निर्मिती होणार आहे अशी माहिती ऐकिवात आहे, आणि ही माहिती जर खरी असेल तर जुना खटाव मतदारसंघाची पुन्हा निर्मिती होणार आहे.या मतदारसंघात आमदार महेश शिंदे यांचे गाव येत असल्याने इथून त्यांच्या पत्नी सौ प्रियाताई शिंदे इच्छुक आहेत अशी माहिती कळते.त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिंदे दापत्य उमेदवार असले तर आश्चर्य वाटायला नको.





Social Plugin