Ticker

6/recent/ticker-posts

टिप्पर व दुचाकी मध्ये धडक अपघातात महीला शिक्षिकेचा मृत्यू तर पती गंभीर जखमी



 गुणवंत राठोड  कारंजा लाड प्रतिनिधी

सविस्तर असे की खेरडा ते अमरावती रोड वर विळेगाव फाट्याजवळ भेंडगाव येथील रहिवासी व शिक्षिका वैशाली नितीन गावंडे (वय ४२) यांचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्यांचे पती नितीन गावंडे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राप्त माहितीनुसार, नितीन गावंडे व वैशाली गावंडे हे रविवारी सकाळी भेंडगावहून अमरावतीकडे दुचाकीने जात होते. त्यांची मोठी मुलगी स्नेहा ही अमरावती येथे पॉलिटेक्निकचे शिक्षण घेत आहे. रविवारची सुटी असल्याने

मुलीला घरचा डबा देण्यासाठी हे दाम्पत्य उत्साहाने निघाले होते. मात्र, विलेगाव फाट्याजवळ एका अज्ञात टिप्परने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, वैशाली गावंडे यांचा जागीच मृत्यू झाला, तर नितीन गावंडे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली.

अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन मदतकार्य केले. जखमी नितीन गावंडे यांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी तातडीने नागपूर येथे हलविण्यात आले. या अपघाताची माहिती मिळताच पिंजर, बार्शीटाकळी व परिसरात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. वैशाली गावंडे या पिंजर येथील ज्ञानप्रकाश विद्यालयात शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या.