प्रतिनिधी- गौरव ब्राम्हणवाडे
नांदगाव खंडेश्वर : नांदगाव खंडेश्वर येथे सुसज्ज बस डेपो उभारण्याच्या मागणीला अखेर यश आले असून प्रशासनाने यासाठी सकारात्मक पावले उचलली आहेत. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच उपजिल्हाधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य जागा तातडीने शोधण्याचे आदेश दिले आहेत. ही मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) नांदगाव खंडेश्वरतर्फे करण्यात आली होती.
गुरुवार, १२ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीस अभाविप प्रांत कार्यकारणी सदस्य तेजस पाठक, नांदगाव खंडेश्वरचे नगरमंत्री ओम मोरे, श्रेणिक मोरे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळचे विभागीय अभियंता, तहसीलदार नांदगाव खंडेश्वर व अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.
सध्या नांदगाव खंडेश्वर येथे स्वतंत्र बस डेपो नसल्यामुळे विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य प्रवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. बसच्या नियमित पार्किंगची व्यवस्था नसल्याने वेळापत्रकात अडथळे निर्माण होतात. प्रवाशांना रस्त्याच्या कडेला उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागते. पावसाळा व उन्हाळ्यात आवश्यक सुविधा नसल्याने विशेषतः ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो आणि त्यांच्या शैक्षणिक वेळेवर परिणाम होतो.
अभाविपच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत जागा निश्चित करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रस्तावित सुसज्ज बस डेपोमध्ये प्रवाशांसाठी प्रशस्त प्रतीक्षालय, स्वच्छतागृहे, डिजिटल वेळापत्रक फलक, सुरक्षित पार्किंग व्यवस्था आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत. या उपक्रमामुळे नांदगाव खंडेश्वरच्या विकासाला मोठी चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
.jpg)




Social Plugin