प्रतिनिधी - गौरव ब्राम्हणवाडे
नांदगाव खंडेश्वर : शहरातील साडेसातशे वर्षांपूर्वीचे पुरातन श्री खंडेश्वर शिवालय महाशिवरात्री महोत्सवानिमित्त भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहे. ‘हर हर महादेव’च्या जयघोषात सुरू असलेल्या या उत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
महोत्सवादरम्यान देवाशिष महाराज लिल्लारे यांचे शिवमहापुराण कथा प्रवचन, दररोज शिवलिंगाचा अभिषेक, सामुदायिक ध्यान, हरिपाठ, प्रार्थना, आरती व कीर्तन यांसारखे धार्मिक उपक्रम पार पडत आहेत. १६ फेब्रुवारी रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी सात वाजता शहरातून ‘श्रीं’च्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.
साडेसातशे वर्षांपूर्वी यादव कालखंडात रामदेवरायाच्या कारकीर्दीत बांधण्यात आलेले हे हेमाडपंथी शिवालय हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मंदिराच्या दगडी भिंतींवर कोरलेली उत्कृष्ट शिल्पकला, पूर्वेकडील दर्शनी दरवाजावरील नक्षीकाम आणि देवनागरी लिपीतील शिलालेख या मंदिराच्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष देतात. मुख्य गाभाऱ्यात प्राचीन शिवलिंगाची स्थापना असून उत्तरेकडे शिवपार्वतीचे मंदिर आहे. पश्चिमेकडील देवळात नृसिंह अवताराची दुर्मिळ मूर्ती भाविकांचे लक्ष वेधते. तिन्ही मंदिरांवर ध्यानगृह असून परिसरात दगडी परकोट, आनंद मंदिर व उत्तुंग दीपमाळ आहे.
हेमाडपंथी वास्तुशैलीचे वैशिष्ट्य
हे मंदिर हेमाडपंथी शैलीत उभारलेले असून चुन्याविना दगडांची बांधणी हे या शैलीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. भिंतींवरील कोरीव मूर्ती, भव्य खांब आणि सूक्ष्म नक्षीकाम यादवकालीन स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून ओळखले जाते.
महाशिवरात्रीचे धार्मिक महत्त्व
महाशिवरात्री हा भगवान शंकराच्या उपासनेचा प्रमुख सण मानला जातो. या दिवशी रात्रभर जागरण, रुद्राभिषेक, बेलपत्र अर्पण आणि ‘ॐ नमः शिवाय’ जप केल्यास विशेष पुण्यप्राप्ती होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री खंडेश्वर संस्थान महाशिवरात्री महोत्सव आयोजन समितीने केले आहे.





Social Plugin