सतीश पांडे कळमेश्वर प्रतिनिधी
कळमेश्वर: तालुक्यातील गोरगरीब जनतेचा एकमेव आधार असलेले ग्रामीण रुग्णालय सध्या स्वतःच 'आजारी' असून, रुग्णालयाची इमारत अत्यंत जीर्ण व धोकादायक अवस्थेत आली आहे. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जिल्हा शल्यचिकित्सकांना निवेदन देऊन नवीन इमारत व चीरघराचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. रुग्णालयाच्या भिंतींना गेलेले मोठे तडे आणि पावसाळ्यात छतावरून होणारी गळती यामुळे रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला असून, ही मागणी सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत कळीची ठरत आहे.
रुग्णालयातील मुख्य इमारतीसोबतच येथील चीरघर (पोस्टमार्टम कक्ष) देखील मोडकळीस आले असून, तेथे मृतदेहांचे विच्छेदन करताना डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. या ठिकाणी तातडीने नवीन बांधकाम करून आवश्यक मनुष्यबळ व आधुनिक साहित्य उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या आणि रुग्णांचा ओघ पाहता सध्याची अपुरी जागा आणि सोयीसुविधांचा अभाव यामुळे आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला असल्याचे विदारक चित्र सध्या कळमेश्वर मध्ये पाहायला मिळत आहे.
सध्या संपूर्ण कळमेश्वर तालुक्यात याच विषयाची जोरदार चर्चा सुरू असून, हा प्रश्न थेट सामान्य जनतेच्या जगण्याशी निगडित आहे. त्यामुळे शहरातील नवनियुक्त नगर परिषदेने देखील या गंभीर प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन शहराच्या प्रलंबित समस्यांची सोडवणूक करणे तितकेच गरजेचे आहे. नवीन प्रशासकीय बॉडीने या विषयात पुढाकार घेऊन तातडीने शासनस्तरावर पाठपुरावा केल्यास रखडलेल्या निधीला आणि कामाला गती मिळू शकते, अशी सकारात्मक अपेक्षा जनतेकडून व्यक्त केली जात आहे. रुग्णालयाचे तातडीने तांत्रिक परीक्षण करून नवीन सुसज्ज इमारतीसाठी प्रशासकीय मान्यता मिळवणे आता काळाची गरज बनली आहे.
"सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी आणि सुरक्षेचा हा खेळ थांबला पाहिजे. प्रशासनाने यावर त्वरित कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल," असा इशारा मंगेश गमे यांनी दिला आहे. या निवेदनामुळे आता आरोग्य विभाग आणि स्थानिक प्रशासन नेमकी काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित प्रशासनाने युद्धपातळीवर कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
निवेदनाची दखल घेत डॉ.निवृत्ती राठोड जिल्हा.नागपूर जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ.शमीम अख्तर वैद्यकीय अधीक्षक, डॉ.रजिया पारेख वैद्यकीय अधिकारी, डॉ. गिरीश वानखडे वैद्यकीय अधिकारी, डॉ.कांचन आखरे वैद्यकीय अधिकारी, डॉ.सुनील आयुष वैद्यकीय अधिकारी, अक्षय गलांडे उप अभियंता कळमेश्वर, डॉ.दिपाली कुलकर्णी तालुका वैद्यकीय अधिकारी तसेच कळमेश्वर शहर नगरसेवक प्रभाग क्रमांक दोन श्रीमती विशाखा गमे, विनोद जी मुंडवाईक, शिवसेना नागपूर शहर संघटक मोरेश्वरजी कट्यारमल आणि मंगेश गमे उपस्थित होते.





Social Plugin